पुणे-माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रतिभाताई पाटील यांचा आज सत्कार होऊ शकला नसला तरी या व्यासपीठावर उपस्थित शरद पवार यांच्या हस्ते हा सत्कार होत आहे. शरद पवार हे भावी राष्ट्रपती आहेत, असे मिश्किल उदगार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे एका कार्यक्रमादरम्यान काढले. यामुळे शिंदे मनातलेच बोलले की काय या भावनेने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
यावेळी शरद पवार म्हणाले, प्रतिभाताई पाटील यांनी देखील अनेक महत्वाच्या पदांवर कामे केली आणि त्याला न्याय देखील दिला. मात्र, त्याचे एका पदावर काम करायचे राहून गेले ते म्हणजे मुख्यमंत्रीपद. त्यांच्यापासून हे पद हिरावून घेण्याचे काम मात्र मी केले, असे ते मजेत म्हणाले. दरम्यान, शेवटपर्यंत लोकांशी संवाद साधत राहणार असल्याचे सांगताना, हा माझा मार्ग नाही असे सांगत भावी राष्ट्रपती या चर्चेला शरद पवार यांनी पूर्ण विराम दिला.
राज्यपाल आणि राष्ट्रपतीपद मिळालेली व्यक्ती निवृत्त होते. मला अजूनही सामान्य जनतेत राहायचे आहे . त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या वाटेला जायचे नाही”, अशा सूचक शब्दांत राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आपण नसल्याचे श्री . पवार यांनी स्पष्ट केले.