पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचच्यावीतने कवयित्री शांताबाई शेळके यांच्या स्मृतीदिनानिमित्त सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन
पुणेः मागे उभा मंगेश… हे शाम सुंदरा… तोच चंद्रमा नभात… अशा प्रेम गीतांपासून ते विरहगीतांपर्यंत आणि लावणीपासून ते परमेश्वराच्या आराधनेत निखळ आनंद देणाऱ्या व रसिकांच्या मनात रुणझुणत ठेवणाऱ्या चौफेर गीतांचा आस्वाद पुणेकरांनी घेतला. यावेळी सुरेश राऊत यांनी शांताबाईंच्या गीतांप्रमाणेच त्यांचे सुंदर शिल्प साकारले.
पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचच्यावतीने कवयित्री शांताबाई शेळके यांच्या स्मृती दिनानिमित्त ‘शांताबाई – एक शब्द लेणे’ या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मी रस्त्यावरील पूना गेस्ट हाऊस येथे करण्यात आले. यावेळी जयंत भीमसेन जोशी, उर्मिला कराड, मीरा शिंदे, राजन लाखे, डॉ.न.म.जोशी आनंद सराफ, अनुराधा मराठे, गीतांजली हट्टंगणी, नितीन दलाल, दिपक कुलकर्णी, गोपाळ शिंर्गे, उल्हास कुलकर्णी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार व समन्वयक अजित कुमठेकर यांनी केले. यावेळी सुरेश राऊत यांनी शांताबाई शेळके आणि लता मंगेशकर यांचे लाईव्ह शिल्प साकारले.
कार्यक्रमाची सुरूवात मागे उभा मंगेश या अभंगाने झाली. त्यानंतर तोच चंद्रमा नभात… मीही अशी भोळी कशी ग…या प्रेम गीतांनी रसिकांना पुन्हा भुरळ पाडली. तर घण रानी… माझ्या सारंग राजा सारंग, माजे रानी माजे मोगा अशा विविध गीतांनी रसिकांची मने जिंकली. यावेळी स्वाती पेंडसे, रेवती सुपेकर व अभिजित वाडेकर यांनी गायन केले. पराग पांडव (तबला), अदिती गराडे (हार्मोनियम), सुहास गाडगीळ (बासरी व व्हायोलिन) यांनी साथसंगत केली. प्राजक्ता वैद्य यांनी निवेदन केले.
उर्मिला कराड म्हणाल्या, इतक्या प्रतिभावंत व्यक्तीचा सहवास मला लाभला हे मी माझे भाग्य समजते. त्यांच्या सहवासातील साधेपणा खूप काही शिकवणारा होता. शांताबाईंच्या सहज सुंदर व्यक्तीमत्वाप्रमाणे त्यांच्या निर्मळ गीतांनी प्रत्येकाच्या मनातील गाभारा आजही तेवत ठेवला आहे, असेही त्यांनी सांगितले.

