पुणे-
‘सेतू अभिवाचन मंच’, पुणे या संस्थेने ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित कविवर्य ‘विंदा करंदीकर’ यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘तसेच घुमते शुभ्र कबूतर’ या काव्य-मैफलीतून त्यांच्या कवितांचे अभिवाचन शनिवारी संध्याकाळी पत्रकार भवनात केले. ‘गीतांजलि जोशी’, ‘श्रुति विश्वकर्मा’ ‘मुकुंद दातार’ आणि दीपाली दातार यांनी यावेळी विंदांच्या ‘एक परी फूलवेडी’, ‘पत्ता’ यासारख्या बालकविता, ‘माझ्या मना बन दगड’, ‘ती जनता अमर आहे’ यासारख्या सामाजिक कविता, ‘प्रेम करावे असे परंतु’, ‘थोडी सुखी थोडी कष्टी’, ‘माझे मला आठवले’ अशा प्रेमकविता, ‘उपयोग काय त्याचा’, ‘साठीचा गझल’, ‘तेच ते’ यासारख्या मिश्किल कविता, ‘ऊन हिवाळ्यातील शिरशिरता’ सारख्या निसर्ग कविता, ‘झपताल’, ‘बंदिश- एक स्वरचित्र’ तसेच ‘सावल्या’, ‘कसा मी कळेना’ या सारख्या चिंतनशील कवितांचे सादरीकरण केले.
‘तसेच घुमते शुभ्र कबूतर’, ‘पवित्र मजला’, ‘ओंजळीत स्वर तुझेच’, ‘माथेरान एक भास’, ‘जन्मा आधी जन्मे’ आणि ‘कसा मी कळेना’ या कवितांना ‘श्रुति विश्वकर्मा’ यांनी अर्थवाही चाली दिल्या होत्या. केवळ तानापुर्याच्या स्वरांवर श्रुतिने सादर केलेल्या या कवितांच्या गायनाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. नीता तोरगट्टी यांनी काढलेले विंदाचे व्यक्तिचित्र आणि सत्यश्री मांडके यांनी काढलेले ‘तसेच घुमते शुभ्र कबूतर’ ह्या कवितेवरील चित्र यामुळे कार्यक्रमात वेगळीच रंगत आली. या कार्यक्रमाची संहिता दीपाली दातार यांनी लिहिली होती. गीतांजलि जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विंदाच्या कन्या ‘जयश्री काळे’, जावई ‘विश्वास काळे’ तसेच चिरंजीव ‘आनंद करंदीकर’ आणि स्नुषा ‘सरिता’ करंदीकर’ यावेळी उपस्थित होते. .