पुणे- पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदार पूनावाला यांच्या मोबाईल नंबरवरून बनावट व्हॉटसअॅप मेसेज पाठवून विविध खात्यात पैसे पाठविण्यास सांगून तब्बल एक कोटी एक लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.बंडगार्डन पोलिस ठाण्यात याप्रकरणी आयपीसी 4119, 420, 34 सह आयटी अॅक्ट 66 सी व डी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीरम इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे फायनान्स मॅनेजर सागर कित्तूर यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे. हा सर्व फसवणुकीचा प्रकार सात व आठ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने घडला आहे. सीरम कंपनीचे सीईओ पदावर अदार पूनावाला काम करत असून कंपनीच्या संचालक पदावर सतीश देशपांडे हे काम करत आहे. देशपांडे यांच्या मोबाईलवर कंपनीचे सीईओ अदार पूनावाला यांच्या मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअॅप मेसेज आला. त्या मेसेज मध्ये काही बँक खाती नंबर देण्यात आलेली होती. या नंबरवर तात्काळ पैसे पाठविण्यास सांगण्यात आले होते.
कंपनीचे मालकांचा मेसेज आल्याने व त्यांनी तातडीने पैसे भरण्यास सांगितल्याने देशपांडे यांनी याबाबतची माहिती कंपनीचे फायनान्स मॅनेजर सागर कित्तूर यांना दिली. त्यानुसार कित्तुर यांनी बनावट मेसेजद्वारे आलेल्या विविध बँक खात्यावर एक कोटी एक लाख एक हजार रुपये भरले.मात्र, त्यानंतर याबाबत कित्तुर यांनी कंपनीत चर्चा केल्यानंतर, अदार पुनावाला यांनी अशाप्रकारे विविध बँक खात्यावर पैसे भरण्यास कोणत्याही मेसेज केलेला नव्हता ही बाब उघडकीस आली. त्यामुळे आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचे कंपनीच्या लक्षात येताच याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे ठरेल. त्यानुसार कंपनीचे फायनान्स मॅनेजर सागर कित्तुर यांनी याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. बंडगार्डन पोलिस याबाबत पुढील तपास करत आहे.