पुणे- कोथरुड येथील 12 वर्षीय विश्वजीत नामक मुलाच्या निर्घृणपणे खून झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून तो बेपत्ता होता. त्याचा खून झाल्याचे समजताच परिसरात खळबळ उडाली, शोक अनावर होवून महिला रडत होत्या.
याबाबत पोलीस सूत्रानी दिलेल्या माहिती नुसार, केळेवाडी येथील नवजवान मित्र मंडळाजवळील एका खोलीत भाडेकरु म्हणून विनोद आदीनाथ वंजारी हे राहत होते. त्यांचा मुलगा विश्वजीत हा शुक्रवारपासून बेपत्ता झाला होता. मुलगा हरवला असल्याची तक्रार वंजारी यांनी पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती.खेळायला जातो म्हणून घराबाहेर गेलेला मुलगा कुठे गेला म्हणून सर्वच जण शोध घेत होते. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास त्याचा मृतदेह महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पौडरस्त्यावरील मोकळ्या जागेत आढळून आला.
गुन्हेगाराची खैर नाही-
पोलिस उपनिरिक्षक भैरवनाथ शेळके म्हणाले की, आम्ही परिसरातील सीसीटीव्ही तसेच एआरएआय टेकडी परिसर, ड्रेनेज इत्यादी पाहीले. अनेकांकडे चौकशी केल्या. आज आम्हाला त्याचा मृतदेह आढळून आला. पालकांनी व्यक्त केलेल्या संशयितांची चौकशी सुरु आहे. जास्तीत जास्त मेहनत आणि बुद्धिमत्तेने तपास करून गुन्हेगाराचा छडा लावू, त्याची अजिबात खैर केली जाणार नाही.

