महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी आणि कन्सर्न इंडिया फाऊंडेशनतर्फे २२४ विद्यार्थीनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण
पुणे : शालेय वयामध्येच छेडछाडीला विरोध करण्याचे कौशल्य व तंत्र विद्यार्थीनींमध्ये विकसित व्हावे आणि स्वसंरक्षणाचे धडे घेत विद्यार्थींनी शारिरीकदृष्टया देखील आत्मनिर्भर व्हावे, याकरीता हुजूरपागेमध्ये विद्यार्थीनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात आले. कोणत्याही ठिकाणी छेडछाडीच्या प्रसंगाला सामोरे जाताना स्वसंरक्षण करण्यासोबतच समोरच्यावर आघात कसा करावा, याची प्रात्यक्षिके सादर करीत शालेय विद्यार्थीनींनी उपस्थितांना थक्क केले.

महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी आणि कन्सर्न इंडिया फाऊंडेशनतर्फे लक्ष्मी रोड विभागातील एचएचसीपी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आणि सौ. शोभाताई रसिकलाल धारिवाल हुजूरपागा इंग्रजी माध्यम या शाळांमधील इ . ९ वी तसेच इंग्लिश मिडीयम ज्युनियर कॉलेज, लक्ष्मी रोड इ .११ वीच्या २२४ विद्यार्थिनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात आले. लक्ष्मी रस्त्यावरील सभागृहात या प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमप्रसंगी कन्सर्न इंडिया फाऊंडेशन पुणे विभागाच्या प्रमुख हायसिंथ डिकोस्टा, सोसायटीच्या अध्यक्षा रेखा पळशीकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका रंजना वाठोरे, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका प्रियदर्शनी पुरोहित आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
हायसिंथ डिकोस्टा म्हणाल्या, नागरिकांचे सबलीकरण हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन फाऊंडेशन कार्यरत आहे. शालेय वयातच विद्यार्थीनींना स्वसंरक्षणाचे धडे मिळावे, याकरीता हे प्रशिक्षण देण्यात आले. दैनंदिन जीवनात अडचणी निर्माण झाल्यास याचा उपयोग होणार आहे. यामध्ये सर्व प्रकारचे कौशल्य व तंत्र विद्यार्थीनींना शिकविण्यात आल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली आहे.
प्रियदर्शनी पुरोहित म्हणाल्या, शाळा ही फक्त शिक्षणापुरती मर्यादित नसून विद्यार्थीनींच्या सर्वांगिण विकासाकरीता काम करते. महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीतर्फे असे नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. शारिरीक, मानसिकदृष्टया मुली व महिलांनी सक्षम होणे गरजेचे आहे. त्यामुळे मुलींना शारिरीकदृष्टया सक्षम करण्याचे काम या उपक्रमाने केले आहे.
स्वसंरक्षण प्रशिक्षणाने आमच्यामधील आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे आमच्या आजूबाजूच्या मैत्रिणींना देखील असे प्रशिक्षण घेण्याकरीता उद्युक्त करु. भविष्यात देखील या प्रशिक्षणाचा आम्हाला खूप उपयोग होणार असल्याची भावना विद्यार्थीनींनी व्यक्त केली. श्रद्धा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. स्मिता वेळापुरे यांनी आभार मानले.

