एक तृतीयपंथी ते माळशिरस सरपंच असा खडतर प्रवासची घेतली दखल
पुणे – एक तृतीयपंथी ते माळशिरस (अकलूज) येथील सरपंच असा प्रवास करणे सोपं नव्हतं, मात्र राजकारणात आल्यावर लोकांचा तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोकांनी आपल्यात सामावून घेतलं त्यातून तृतीयपंथी समाजामध्ये एक सकारात्मक संदेश गेल्याची भावना माऊली कंबळे यांनी व्यक्त केली. त्या बालगंधर्व रंगमंच येथे पार पडलेल्या किन्नर सन्मान सोहळ्यात बोलत होत्या.
रविवार (20 मे) ला पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले. यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, मनसे च्या माजी नगरसेविका रुपाली पाटील उपस्थित होते. यावेळी कला, चित्रपट, राजकारण, शिक्षण, समाजकार्य आशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा तृतीयपंथीयांचा सन्मान करण्यात आला.
प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून आत्मविश्वासाच्या जोरावर आपण सरपंच पदापर्यंत पोहोचलो. समाज आमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायचा, लोक माझ्याकडे पाहून तोंड फिरवायचे, मात्र आत्मविश्वासाच्या जोरावर राजकारणात प्रवेश केला. लोकांसाठी काम केले, त्यातून तळागाळापर्यंत पोहचण्यात यश आले. त्यातून समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. यापुढे माझ्या समाजासाठी शासनस्तरावर जे काही करता येईल ते नक्की करण्याचा प्रयत्न करणार आहे, त्याचबरोबर गावाच्या विकासाचाही प्रयत्न असेल असेही माऊली यांनी यावेळी नमूद केलं.
यावेळी धेंडे म्हणाले, ” माऊलीला राजकारणात आल्यावर जनतेने स्वीकारले, त्याचप्रमाणे इतर तृतीयपंथीयनाही समाजाने सामावून घेण्याची गरज आहे. तृतीयपंथीयांच्या बळकटीकरणासाठी पुणे महापालिका पुढाकार घेत आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी पालिका घेईल. त्यांनी शिक्षण घेऊन पुढे आले पाहिजे तरच ते मुख्य प्रवाहात येऊ शकतील, त्याशिवाय प्रगती नाही. तसेच तुम्हाला ओळख मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहील. सामाजिक, आर्थिकस्तर उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, त्यासंबंधी सूचना जरूर पालिकेला कळवा, त्यांचा पाठपुरावा करून योग्य त्या योजना आम्ही आपल्यापर्यंत पोहचवण्याचा नक्की प्रयत्न करू”
यावेळी मेघराज भोसले म्हणाले, “किन्नर समाजात अनेक उत्तमोत्तम कलाकार आहेत. समाजाकडून त्यांची दाखल घेतली जात नाही हे दुर्दैव आहे. त्यांच्या कलेला दाद मिळावी, कामाला प्रोत्साहन मिळावे आणि पुढील वाटचालीसाठी उमेद मिळावी यासाठी चित्रपट महामंडळ त्यांच्या पाठीशी आहे. समाज बदलत असताना तृतीयपंथीयांकडे पाहायचा आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे. त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेतले पाहिजे, या सन्मान सोहळ्याने त्याला बळकटी मिळेल”