पुणे, ता. 18 जुलै – ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या (डीईएस) ‘मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालया’च्या वतीने ‘मृत्युंजयी स्वातंत्र्यवीर सावरकर’ या नृत्य, नाट्य, संगीत आणि अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शाला समितीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येत्या रविवारी (24 जुलै) सकाळी साडेनऊ वाजता स्वारगेट येथील गणेश कला-क्रीडा मंच येथे हा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे, योगेश सोमण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ‘डीईएस’च्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
‘जयदेव जयदेव जय शिवराया’, ‘जयोस्तुते’, ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ अशी प्रसिद्ध आणि अप्रचलित गाणी गायली जाणार आहे. ‘संगीत सन्यस्त खड्ग’ या नाटकातील नाट्यप्रवेश होणार आहे. ‘हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा’ आणि ‘वंदे मातरम्’ या गीतांवर नृत्यांचे सादरीकरण केले जाणार आहे. दृक-श्राव्य माध्यमातून 150 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

