मानवी आणि नैसर्गिक संकटात भारतभरातील गरजू व वंचित समाजाला मदतीचा हात देण्याचा मुकुल माधव फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम
पुणे : “मानवी आणि नैसर्गिक संकट काळात देशभरातील गरजू व वंचित समाजाला सन्मानाने जगण्यासाठी मदतीचा हात देण्याचा मुकुल माधव फाउंडेशनचा उपक्रम स्तुत्य आहे. गोरगरीब जनतेच्या पाठीशी राज्य सरकार तर आहेच; पण उद्योग आणि सामाजिक संस्था हिरीरीने पुढाकार घेत आहेत, ही समाधानाची बाब आहे,” असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनच्या पुढाकारातून आयोजित ‘गिव्ह विथ डिग्निटी’ उपक्रमाचा शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी झाला. मुंबईतील मातोश्री क्लब हाऊस येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, ऍड. गौरी छाब्रिया, हिंदुजा फाउंडेशनचे सीईओ पॉल अब्राहम, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष बी. आर. मेहता, ऑर्बिटचे संचालक संजय आशेर आदी उपस्थित होते.
कोरोना, नैसर्गिक आपत्तीच्या कठीण स्थितीत गरजू व वंचितांची दिवाळी आनंदमय होण्यासाठी मुकुल माधव फाउंडेशन ‘गिव्ह विथ डिग्निटी’ उपक्रम देशभर राबवत आहे. या उपक्रमाद्वारे भारतातील २४ राज्यांतील ७० हजार कुटुंबातील तीन लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. चार सदस्यीय कुटुंबाला २१ दिवसांसाठी पुरेल इतके साहित्य देण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘फ्लॅग ऑफ’ झाल्यानंतर महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, अमरावती, बीड, उस्मानाबाद, गडचिरोली, वाशीम, रत्नागिरी, पालघर, बुलढाणा, परभणी, नाशिक, सोलापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव आदी जिल्ह्यात २०-२५ हजार कुटुंबाना मदत दिली जाणार आहे.
समविचारी संस्था, मित्र परिवार आणि फाउंडेशनच्या हितचिंतकांच्या माध्यमातून तसेच जिल्हा प्रशासनाच्या मदतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहोत. फिनोलेक्स इंडस्ट्रीज, केव्हिनकेअर, मारिको, हिंदुजा फाऊंडेशन, नेसले, इंडोरमा, इंडसइंड बँक, अशोक लिलॅन्ड, गल्फ ऑइल आदींचा समावेश आहे. ही किट्स पूर्ती ग्रुप, माणदेशी फाउंडेशन, स्टार फूड्स यांनी तयार केले आहेत. सेंटर फॉर युथ डेव्हल्पमेंट्स अँड ऍक्टिव्हिटी (सिवायडीए) संस्थेकडून मास्क आणि बारामती येथील सोबती संस्थेकडून सॅनिटरी नॅपकिन्स घेण्यात आले आहेत.
मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितु प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, “वैश्विक महामारीचा काळ आव्हानात्मक होता. लोकांच्या आर्थिक, मानसिक, शारीरिक स्वास्थ्यावर, तसेच दैनंदिन जीवनावर नकारात्मक परिणाम झाला. त्यांना आधार देण्यासाठी कंपन्या, समविचारी सहकारी, स्वयंसेवी बचत गट, लघु व माध्यम उद्योग या सर्वांच्या सहकार्यातून हा उपक्रम चालतोय. फिनोलेक्सच्या प्रादेशिक, जिल्हा स्तरावरील टीमकडून मोठे सहकार्य मिळत आहे. या उपक्रमातून अनेक कुटंबांची दिवाळी प्रकाशमान होईल.”

