पुणेः सतारीवर छेडलेल्या तारांमधून निघाणारे मंजूळ स्वर… श्रवणीय स्वरांनी प्रफुल्लित झालेले वातावरण… सतारीवर फिरणारी बोटे आणि त्यातून अवतरलेल्या जादूई स्वरात शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, लावणी, भावगीत आणि कव्वाली एकण्याची संधी पुणेकरांनी मिळाली. प्रत्येक रागातील स्वर उलगडून दाखविणाऱ्या सुश्राव्य वादनामध्ये श्रोते तल्लीन झाले.
पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचच्यावतीने ‘सतार गाई गाणे’ या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुंबईचे ज्येष्ठ सतारवादक चंद्रशेखर फणसे यांनी सतारवादन केले. डॉ. सुजाता भट (तानपुरा), विशाल गंडुततवार (तबला), विवेक परांजपे (सिंथेसायझर), गायक मकरंद पाटणकर, गायिका मनीषा निश्चल, प्रिती पेठकर, पल्लवी आनिखिंडी, मयुरा काळे, वैजू चांडवले, आणि योगिता बडवे यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे आयोजन किशोर सरपोतदार, साधना सरपोतदार व समन्वयक अजित कुमठेकर यांनी केले.
कार्यक्रमाची सुरूवात पंडित रवीशंकर यांनी रचलेल्या तिलकशाम या रागाने झाली. त्यानंतर पंडित भिमसेन जोशी यांनी गायलेल्या रम्य ही स्वर्गाहून लंका या हिंडोल रागातील सतारवादनाने श्रोत्यांची मने जिंकली. सतारीवर सादर केलेल्या कवन, लावणी, शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीतातील गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. अतिशय दुर्मिळ अशा भूपेश्वरी रागात सतारीच्या विविध रचनांनी रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. जुन्या हिंदी गीतांनी कार्यक्रमाची सांगता झाली. कायर्क्रमात प्रख्यात सतारवादक उस्ताद उस्मान भाई खान, सतारवादक आलोक फडके, कल्याणी देशपांडे, व्हायोलिन वादक अंजली सिंगडे-राव, आनंद सराफ, सचिन चपळगावकर, गौरी प्रधान आदी उपस्थित होते.

