मुंबईत होणाऱ्या १९ व्या ‘मुंबई अॅकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजेस‘ म्हणजेच मामि फिल्म फेस्टिव्हल‘साठी सर्वनाम या मराठी सिनेमाची निवड करण्यात आली आहे. गिरीश मोहिते दिग्दर्शित या सिनेमाची ‘मामि’ फेस्टिव्हलच्या ‘इंडिया स्टोरी’ या विभागात ही निवड झाली आहे. ‘इंडिया स्टोरी’ या विभागात विविध भारतीय भाषांमधील एकूण ११ चित्रपटांची निवड झाली असून त्यात सर्वनाम या एकाच मराठी सिनेमाचा समावेश आहे. आमच्यासाठी ही अभिमानाची बाब असून प्रखर सत्यावर भाष्य करणारा हा सिनेमा प्रेक्षकांना भावेल, असा विश्वास गिरीश मोहिते यांनी व्यक्त केला.
‘नाम’ एका विशिष्ट् व्यक्तीचं अस्तित्व अधोरेखित करतं मात्र सर्वनाम ही सामुहिक संज्ञा आहे. स्वतःची ओळख जपत जगताना, नियती अनेकदा असा काही अनाकलीय खेळ खेळते की स्वतःचं अस्तित्व विसरून सर्वनामात विलीन झाल्याशिवाय पर्याय राहत नाही. सर्वनाम हा सिनेमा ह्या प्रखर सत्याचा अनुभव देतो. आपल्या सिनेमांमधून वेगळं काहीतरी देऊ पाहणाऱ्या दिग्दर्शक गिरीश मोहिते यांचा सर्वनाम हा सिनेमासुद्धा निश्चितच वेगळा असेल.
आदिरोहन एंटरटेन्मेंटने या सिनेमाची प्रस्तुती केली आहे. ‘प्री टू पोस्ट फिल्म्स निर्मित’ व गिरीश मोहिते दिग्दर्शित सर्वनाम मध्ये मंगेश देसाई, दिप्ती धोत्रे, उमेश बोळके आणि मास्टर राजवर्धन राहुल देसाई यांच्या भूमिका आहेत. याचे सहनिर्माते रोहन बनसोडे आहेत. छायांकन कृष्णा सोरेन तर संकलन निलेश गावंड यांचं आहे. कथा बशीर मुजावर यांची असून पटकथा गिरीश मोहिते व आशुतोष आपटे यांची आहे. संगीत अविनाश–विश्वजीत यांनी दिलं असून कलादिग्दर्शन दिगंबर तळेकर यांनी केलं आहे. ‘मामि’ फेस्टिवल १२ ते १८ ऑक्टोबर दरम्यान मुंबईत रंगणार आहे.