राजकीय कार्यकर्त्यांच्या स्टॉलला कायमचे हॉटेल करण्यासाठी ? शहरातील अन्य स्टॉल धारकांना हि देणार असाच न्याय ?
पुणे- सारस बाग येथील केवळ ५३ स्टॉलधारकांचे भले करण्यासाठी सारस बाग वाॅकिंग प्लाझा’प्रस्ताव आणला जात असल्याचा आरोप होत असून,या स्टॉलधारकांनी वर्षानुवर्षे येथील रस्ता बळकावून स्टॉलला हॉटेलचे स्वरूप देऊन कायदा धाब्यावर बसविला तरीही यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्याऐवजी उलट त्यांच्या हॉटेलच्या व्यवसायाला कायम मूर्त स्वरूप देण्यासाठी येथे वाॅकिंग प्लाझाचा प्रस्ताव आणला जातो आहे.त्यांना अशा स्वरूपाचे सहाय्य केले तर शहरात अन्यत्र स्टॉल धारकांना हि याच धर्तीवर महापालिकेला सहाय्य करावे लागेल अशीही भूमिका आता अन्य स्टॉलधारक घेऊ लागले आहेत.सारसबागेतील स्टॉल धारकांवरच एवढी कृपा का? करायचीच तर सर्वांवर करा असा सूर आता उमटू लागला आहे.सारसबागेतील हा रस्ता वर्दळीचा रस्ता असून हा वाहतुकीला बंद करण्यास दुचाकी चालक संघटना देखील आता रिंगणात उतरणार आहेत.पालिकेने असा निर्णय घेतला तर कोर्टात जाण्याची तयारी अनेकांनी दर्शविली आहे.लक्ष्मी रस्ता,मंडई, तुळशीबाग,दगडूशेठ गणपती मंदिर,मजूर अड्डा, भोर आळी,रविवार पेठ,चोळखण आळी असा शहराचा मध्यवर्ती परिसर पालिका वाॅकिंग प्लाझा बनवावा असाच आहे,त्याबाबत काही नाही आणि सारसबागेतील वाहतुकीचा रस्ता मात्र बळकाविण्यासाठी वाॅकिंग प्लाझा बनवू पाहत आहे असे म्हणणे मांडले जाते आहे. शांतीलाल सुरतवाला महापौर असताना त्यांनी लक्ष्मी रस्ता आणि काही परिसर वाॅकिंग प्लाझा बनविण्याचा विचार मांडला होता.
महापालिकेच्या वतीने सारसबाग येथे वाॅकिंग प्लाझा विकसित करण्यात येणार असून त्याबाबतच आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे.हे करताना रस्त्याच्या मध्यभागी दोन्ही दिशांना आणखी ५०स्टॉल ला परवाने देता येतील असाही मुद्दा पालिकेने लक्षात घ्यावा अशी मागणी होत आहे.
सारसबागेची पुनर्रचना करण्यात येणार असल्याने परिसरातील अतिक्रमणांना लगाम बसण्याची शक्यता आहे. तसेच पादचाऱ्यांनाही परिसरातून विना अडथळा चालता येणे शक्य होणार आहे.सारसबागेबाहेरील रस्त्यावर दुतर्फा खाद्यपदार्थांचे स्टॉल; तसेच मुलांसाठी लहान-मोठ्या खेळण्यांचेही स्टॉल आहेत.महापालिकेने या परिसरात ५३ जणांना व्यवसाय परवाने दिले आहेत. मात्र, व्यावसायिकांनी स्टॉलला हॉटेलचे स्वरूप दिले असून, अनेकांचे कामगारही तेथेच राहतात. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मे महिन्यात सारसबागेतील स्टाॅल्सवर कारवाई केली होती. परवानगी असलेल्या जागेतच व्यवसाय करण्याचे आणि अतिक्रमण न करण्याचे हमीपत्र व्यावसायिकांनी द्यावे त्यानंतरच त्यांना मान्यता दिली जाईल,अशी भूमिका महापालिकेने घेतली होती.मात्र त्याचा उपयोग काहीही झाला नव्हता,नेहमीप्रमाणे कारवाई झाली कि लगेच मागे पुन्हा अतिक्रमणे उभारली जात होती. म्हणजे या कारवाईचा संबधितांवर काहीही परिणाम होत नव्हता.परिणाम कारक कारवाई आजवर येथे कधीच झाल्याचे निदर्शनास आलेले नाही.
मात्र काही राजकीय पक्षांनी आणि पथारी व्यावसायिक संघटनांनी त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली होती.त्यामुळे महापालिकेकडून वाॅकिंग प्लाझाचा आराखडा तयार करण्याचे निश्चित करण्यात आले होते.हा आराखडा तयार झाला असून या आराखड्याबाबत सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून येत्या काही दिवसांत त्या संदर्भात बैठक घेऊन त्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे.वॉकिंग प्लाझा तयार झाल्यानंतर चौपाटी परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांना पेशवे उद्यानाजवळ असलेल्या वाहनतळापर्यंत आपली वाहने नेता येतील.त्यामुळे सारसबागेत येणाऱ्यांना आता या रस्त्यावर निर्धास्तपणे चालणे शक्य होईल, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र हे वाहनतळ महापालिकेने स्वतः चालवावे,कोणा ठेकेदारास देवू नये अशी मागणी होते आहे.

