पुणे: सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे नांव देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने खोटारडेपणाचे धोरण आखलेले दिसते. “अहिल्याबाई होळकरांचे नांव सोलापूर विद्यापीठास दिल्यास जातीय तेढ निर्माण होईल व विद्यापीठाच्या निकोप विकासाला अडथळा होईल” असे राज्याचे शिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यांनी विधानसभेत नामविस्ताराच्या प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले होते. त्यांचे हे विधान कामकाजात नोंदले गेले आहे. हे विधान श्री. तावडे यांनी किंवा सोलापूर विद्यापीठ व्यवस्थापन समितीने अद्याप मागे घेतलेले नाही. असे असुनही अलीकडेच नागपुरातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठाचं नामांतर अहिल्यादेवी होळकर करण्याची घोषणा केली खरी पण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या विद्यापीठाचे नाव बदलणार नसल्याचे विधानपरिषदेतच स्पष्ट केले. असे असतांनाही सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये झाला असून, कार्यवाहीसाठी उपसमिती स्थापन करण्यात आल्याची माहिती, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी कालच विधानपरिषदेत दिली. समजा घेतलाच असेल तर मंत्रीमंडळाचा निर्णय श्री. सावरा कसे जाहीर करू शकतात? श्री. तावडेंच्याच आधीच्या अहिल्यादेवींबाबतच्या अवमानास्पद विधानाचे काय झाले? हा सारा प्रकारच गूढ, धुळफेक व कुचेष्टा करणारा आणि अहिल्याबाई होळकरांना मानणा-या देशवासियांच्या सहनशक्तीचा अंत पाहणारा आहे असे मत महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणी यांनी व्यक्त केले.
नामांतर हा अत्यंत वेगळा विषय असला तरी शासनाच्या भोंगळ आणि उडवाउडवी करण्याच्या वृत्तीमुळे तो जास्त संवेदनशील बनला आहे. नामांतरातील घोळापेक्षाही महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी “अहिल्याबाईंच्या नांवामुळे जातीय तेढ वाढेल” असे विधान करावे ही गंभीर बाब आहे. याबाबत त्यांनी अद्यापही माफी मागितलेली नाही किंवा त्यांचे विधान कामकाजातुन वगळले गेलेले नाही. मुख्यमंत्रीही या बाबतीत मौन बाळगुन आहेत. मुलभुत प्रश्नांना बगल दिली जात आहे, मग कोणत्या आधारावर त्यांनी नामांतराची घोषणा केली? विद्यापीठाने अद्याप ठरावच केलेला नाही तर मंत्रीमंडळाने कशाच्या आधारावर नामांतराचा ठराव केला? की जो ठराव झालाच नाही त्याबाबत केवळ धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसण्यासाठी खोटे दामटून सांगितले जाते आहे? असे गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून शासनाची विश्वासार्हता संशयास्पद बनली आहे असेही सोनवणी म्हणाले. या बाबतीत स्वत: मुख्यमंत्र्यांनी तातडीने प्रमाणित कागदपत्रांसहित व योग्य अध्यादेशासहित निवेदन द्यावे. अन्यथा नामांतराच्या सर्व घोषणा या भुलथापा होत्या, फसवणूक होती असे समजले जाईल असेही श्री. सोनवणी म्हणाले.