खासदार काकडेंच्या भेटींमुळे राजकीय वातावरण तापले
पुणे- माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्याबरोबर झालेल्या राजकीय गुप्तगूनंतर मंगळवारी रात्री खासदार संजय काकडे यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री व रिपाइं (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासोबत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘डिनर’ केला. दोघांमध्ये पुणे लोकसभा निवडणूक, सामाजिक घडामोडी आणि पुण्यातील विकासकामांसंदर्भात चर्चा झाली. खासदार काकडेंच्या या सलग भेटी व आठवलेंसोबतच्या ‘डिनर डिप्लोमसी’मुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे.आठवले यांच्यासोबतच्या ‘डिनर’मध्ये खासदार काकडे व आठवले यांच्यात पुणे लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. भाजपामधील खासदार काकडे यांच्याबरोबरच इच्छुक असलेले अन्य उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसने नव्याने केलेला या मतदार संघावरील दावा आणि काँग्रसची भूमिका याविषयी दोघांमध्ये चर्चा झाली.
पुणे लोकसभा मतदार संघात दलित मतदान निर्णायक आहे. रामदास आठवले यांना मानणारा मोठा वर्ग पुण्यात आहे. खासदार काकडे यांचे सुरुवातीपासूनच रामदास आठवले, स्थानिक दलित नेते व कार्यकर्त्यांसोबत सौहार्दाचे संबंध आहेत. खासदार काकडे यांना मानणाऱ्यांपैकी दलित कार्यकर्त्यांची संख्या मोठी आणि शहरातील सर्व प्रभागांमध्ये आहे. खासदार काकडे यांनी पुणे महापालिका निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतरही राजकारणातील जातीय समतोल राखण्यासाठी पुण्याचे उपमहापौर पद रिपाइं ला देण्याचा आग्रह धरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तो मान्य केला आणि रिपाइंला उपमहापौरपद मिळाले.
लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे जाहीर केल्यानंतर तत्काळ खासदार संजय काकडे यांनी वेगाने भेटीगाठी सुरु केल्या आहेत. शहरातील सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमातील त्यांची उपस्थिती वाढली आहे. लोकसभा निवडणूक अजून वर्षभर दूर असली तरी पुण्यातील राजकीय वातावरणाचा पारा उन्हाळ्यातील तापमानाप्रमाणे चांगलाच वाढला आहे.
रिपाइंच्या अधिवेशनाला खासदार काकडेंची प्रमुख उपस्थिती!
पुण्यात येत्या 25 ते 27 मे दरम्यान रिपाइं चे राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. त्याचे आयोजन व नियोजन उत्तम व दर्जेदार करण्यासाठी खासदार काकडे यांची मदत होणार हे निश्चित मानले जात आहे. तसेच, खासदार काकडे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येणार असून तशी चर्चाही केंद्रीय मंत्री रामदास आठवले व खासदार संजय काकडे यांच्यात झाल्याचे समजते.