खासदार काकडेंची भीम फेस्टिव्हलला भेट
पुणे : बाबासाहेबांचे संपूर्ण आयुष्य क्रांतिकारी होते. जगातील अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून त्यांनी भारताची राज्यघटना तयार केली. ही जगातील सर्वोत्तम राज्यघटना मानली जाते. त्यांच्यामुळे करोडो माणसांच्या जीवनात बदल झाला. जोपर्यंत पृथ्वीतलावर मनुष्य असेल तोपर्यंत संपूर्ण विश्वाला त्यांचे जीवन व त्यांचे विचार मार्गदर्शक ठरतील, अशा शब्दांत राज्यसभेचे खासदार व भाजपाचे सहयोगी सदस्य संजय काकडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या.
राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त खासदार संजय काकडे यांनी दांडेकर पूल (सिंहगड रस्ता) येथील अखिल भिमज्योत सेवा संघाच्या वतीने आयोजित भीम फेस्टिव्हलला गुरुवारी सायंकाळी भेट दिली. यावेळी त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.
याप्रसंगी नगरसेवक शंकर पवार, नगरसेवक राजाभाऊ बराटे, नगरसेवक परशुराम वाडेकर, अखिल भिमज्योत सेवा संघाचे अध्यक्ष तानाजी ताकपेरे व उत्सव प्रमुख हृषिकेश ओव्हाळ आदी मान्यवर आणि बाबासाहेबांवर प्रेम करणारे हजारो नागरिक उपस्थित होते.
खासदार काकडे हे गरीब कार्यकर्त्यांचे वाली!
खासदार संजय नाना काकडे हे गरीब कार्यकर्त्याला कधीही न विसरणारे नेते आहेत. त्यांनी आजपर्यंत हजारो गरीब कार्यकर्त्यांना पाठबळ दिले आहे. त्यांचा हात ज्या कार्यकर्त्याच्या डोक्यावर असतो त्याचे सोनेच होते. शक्यतो राजकारणातील नेते गरीब कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करतात पण, खासदार संजय काकडे म्हणजे गरीब कार्यकर्त्यांचा वाली आहेत, असे नगरसेवक परशुराम वाडेकर यांनी यावेळी सांगितले.

