पुणे- पुणे महानगरपालिकेच्या जैवविविधता व्यवस्थापन समितीचे नवीन अध्यक्ष म्हणून श्री संजय (तात्या) घुले यांची निवड महापौर मुरलीधर मोहोळ, यांच्या अध्य्क्षेते खाली बोलविण्यात आलेल्या बैठकीमध्ये झाली. सदर बैठकीस उपमहापौर सौ. सरस्वती शेंडगे, सभागृह नेते,श्री गणेश बिडकर, श्री प्रसन्न जगताप, जैविक विविधता व्यवस्थापन समिती, हरिदास चरवड, सदस्य जैविक विविधता व्यवस्थापन समिती, नगरसेवक धनराज घोगरे, नगरसेवक, अजय खेडेकर इत्यादी उपस्थित होते. पुणे शहराच्या जैवविविधता व्यवस्थापन समितीमध्ये सात सदस्य आहेत – संजय (तात्या) घुले समितीचे अध्यक्ष असून सौ. सरस्वती शेंडगे, सौ. दिपाली धुमाळ, श्री. दिलीप बराटे, श्री प्रसन्न जगताप, श्री. हरिदास चरवड, श्री. अविनाश साळवे हे समितीचे सदस्य आहेत.
जैविक वैविध्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनामार्फत वेळोवेळी कायदे तसेच अधिनियम बनविण्यात आले आहेत. जैविक विविधतेचे रक्षण व्हावे हा या कायद्यांमागील मुख्य उद्देश्य आहे. मे. राज्य शासनाने जैविक विविधता अधिनियम २००८, उपनियम २३ (२) अन्वये प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था जसे की ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिकांनी जैविक विविधता व्यवस्थापन समिती स्थापन करणे आवश्यक आहे.
जैविक विविधतेने संपन्न व पश्चिम घाटापासून जवळ असल्यामुळे पुणे शहर आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर जैव विविधता आढळते. महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळाने विनिर्दीष्ट केलेल्या प्रक्रियेचा आणि नमुन्याचा वापर करून महानगरपालिका स्तरावर लोक जैवविविधता नोंदवही (पीपल्स बायोडायव्हसीटी रजिस्टर) तयार करणे, जीवशास्त्रीय / जैविक साधनसंपत्ती वापरणाऱ्या स्थानिक वैदू व व्यावसायिक यांच्याविषयीची माहिती ठेवण्यास मंजूरी देण्याकरीता राज्य जैव विविधता मंडळ किंवा प्राधिकरणाने संदर्भित केलेल्या कोणत्याही विषयावर सल्ला देणे ही जैवविविधता व्यवस्थापन समितीची अन्य कार्ये आहेत. जैवविविधता समितीचा कार्यकाळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यकाळा एवढाच असतो.