पुणे, दि. ८ – फर्ग्युसन महाविद्यालयातील ’सोशल आऊटरीच अॅण्ड एनाबलिंग सेंटर‘च्या (एसओएसी) वतीने महाविद्यालयातील 58 सफाई कर्मचार्यांचा (आरोग्य मित्र) डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष महेश आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सेवकांनी स्वच्छता आणि आरोग्य या क्षेत्रात दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल हे सत्कार करण्यात आले. प्राचार्य डॉ. रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक समन्वयक प्रसन्न देशपांडे, अमृता शिरपूरकर यांनी संयोजन केले.
आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, शाश्वत विकास या क्षेत्रांत काम करण्यासाठी ‘एसओएसी’ची स्थापना करण्यात आली आहे. सामाजिक कार्य करण्यासाठी या संस्थेत आठशेहून अधिक स्वयंसेवकांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकी ज्ञानाबरोबर सामाजिक ज्ञान जोपासावे हा संस्थेचा उद्देश आहे.

