नळस्टॉप ते फ्लॉयओव्हर एकेरी वाहतूक….कर्वे रस्त्यावरील आवश्यक बदलानंतर १० दिवसांत वाहतूकीतील बदलाची अमलबजावणी….
पुणे-कर्वे रस्त्यावर फ्लायओव्हर ते नळस्टॉप या दरम्यान मेट्रो पिलर चे काम सुरु होत आहे.त्यामुळे या भागातील वाहतूक वळविण्यात येणार आहे.हा वाहतूक बदल कसा असेल याची आज पाहणी करुन,त्याचा सर्व बाजूने विचार करुन आज या बाबतचा निर्णय घेण्यात आला.
या पाहणीसाठी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ,व भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पुढाकार घेतला व नागरिकांच्या सूचनांचा विचार करुन प्रत्यक्ष जागेवरील पाहणीतून वाह्तुकीतील बदल अमलात आणावा असे संबंधित यंत्रणांना सांगितले.त्यानुसार आज पोलिस उपायुक्त वाहतूक अशोक मोराळे,सहाय्यक आयुक्त प्रभाकर ढमाले,पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी,मनपा चे ट्रॅफिक प्लॅनर श्रीनिवास बोनाला व महामेट्रो चे रितेश गर्ग,एन सी सी चे नामदेव गव्हाणे,इतर अधिकारी,तसेच स्थानिक नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,नगरसेवक दीपक पोटे,माधुरीताई सहस्त्रबुद्धे,दिलीप वेडे पाटील,जयंत भावे,मा छायाताई मारणे,मा वासंतीताई जाधव,मा हर्षालीताई माथवड,अल्पनाताई वर्पे यांच्या सह स्थानिक नागरिक संदीप मोकाटे,निलेश घोडके,लक्ष्मीकांत नातू,जयंत जोशी,राजेंद्र येडे,जनार्दन क्षीरसागर इ उपस्थित होते.
यावेळी मेट्रो च्या अधिकारयानी वाहतूक पोलिसांशी सल्ला मसलत करुन वाहतूकीत केल्या जाणाऱ्या बदलांची माहिती दिली.त्यानुसार कोथरूड कडुन येणारी वाहतूक एस एन डी टी शेजारील कॅनाल रस्त्यावर वळविली जाणार असून सदर वाहतूक आठवले चौकातून नळस्टॉप चौकाकडे जाईल.नळस्टॉप ते पौडफाटा उड्डाण पुलापर्यंत एकेरी वाहतूक करण्यात येणार असुन या रस्त्याचा ९ मीटर चा भाग हा मेट्रो पिलर उभारणी साठी वापरला जाणार आहे.
मात्र हा वाहतूक बदल अमलात आणण्यापूर्वी कर्वे रस्त्यावरील आवश्यक बदल तातडीने पूर्ण करावेत अशी सूचना वाहतूक पोलिस सहाय्यक आयुक्त प्रभाकर ढमाले व प्रतिभा जोशी यांनी केली.तर यापूर्वी ठरल्याप्रमाणे संपूर्ण कर्वे रस्ता नो पार्किंग नो हॉल्टिंग झोन करण्याबाबतचे फलक अद्याप लावले नाहीत तसेच पदपथ छोटा करणे,हलविलेल्या बसस्टॉपबाबतचे माहिती फलक उभारले नसल्याबद्दल संदीप खर्डेकर व माधुरीताई सहस्त्रबुद्धे यांनी नाराजी व्यक्त केली.तसेच नवीन बदलाच्या रस्त्यावर ही असे फलक लावणे प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिक वार्डन नेमणे या सूचनांची अमलबजावणी येत्या १० दिवसांत पूर्ण केल्यानंतरच हा वाहतूक बदल केला जावा असे सर्वच लोकप्रतिनिधींनी सांगितले.तसेच कॅनाल रस्त्यावरील पदपथ लहान करणे,आठवले चौकातील डिव्हायडर काढून तेथील व नळस्टॉप चौकातील सिग्नल च्या वेळा बदलणे इ सुधारणा केल्या जाव्यात अशी सूचना मुरलीधर मोहोळ यांनी केली.
मेट्रो चे काम वेगाने पूर्ण करत असताना नागरिकांची सुरक्षितता याला आम्ही प्राधान्य देणार असून वाहतूक कोंडी कमीतकमी व्हावी यासाठी दक्षता घेतली आहे असे मुरलीधर मोहोळ व संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.