पुणे-क्रिएटीव्ह फाउंडेशन च्या वतीने नवरात्र महोत्सव साजरा करतानाच सामाजिक बांधिलकीची जपणूक करण्यात येते हे कौतुकास्पद असून कोणताही उत्सव उत्साहात साजरा करत असताना त्यासोबत समाजोपयोगी उपक्रम राबविले पाहिजेत असे मत मल्टी प्रोफेशनल ट्रैनिंग अकादमी आणि कर्वे समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष सदानंद देशपांडे यांनी व्यक्त केले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन नवरात्र उत्सव समितीच्या वतीने भोर येथील वाघजाई मंदिरास २०० ताटे ४०० वाट्या व चमचे भेट देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी क्रिएटिव्ह चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,उत्सव प्रमुख विशाल भेलके,वाघजाई देवस्थान चे प्रमुख जगन्नाथशेठ भेलके,दत्ताभाऊ राऊत,नगरसेवक यशवंत डाळ,रमेशशेठ ओसवाल इ मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
वाघजाई मंदिराच्या आवारात बांधलेल्या सभागृहात गरीबांची आणि सामान्य कुटुंबातील लग्न समारंभ व अन्य कार्यक्रम होत असतात,येथे भोजनासाठी पत्रावळी किंवा थर्मोकोलच्या डिशेसचा वापर केला जातो,याचा कचरा मंदिरपरिसरात पडतो आणि त्याचा पर्यावरणावर तसेच स्वच्छतेवर,आरोग्यावर दुष्परिणाम होतो ही गरज लक्षात घेऊन ट्रस्ट च्या वतीने देवस्थानास ही भेट देण्यात आल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.तसेच सांस्कृतिक कार्यक्रम,नाट्य महोत्सव,दांडिया व इतर कार्यक्रम करत असताना मंडळांनी काही वाटा सामाजिक उपक्रमांसाठी राखून ठेवावा असे ही खर्डेकर म्हणाले.
यावेळी देवस्थानला केलेल्या उपयुक्त मदतीबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सदानंद देशपांडे,संदीप खर्डेकर व विशाल भेलके यांचा सत्कार करण्यात आला.जगन्नाथ शेठ भेलके यांनी स्वागत केले,यशवंत डाळ यांनी प्रास्ताविक तर दत्ता राऊत यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

