पुणे मनपा ५००० विद्यार्थ्यांना शाडूचे गणपती बनविण्यासाठी प्रशिक्षित करून जागतिक विक्रम करणार -मुरलीधर मोहोळ.
पुणे -महानगरपालिका तब्बल ५००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना एकाच वेळी पर्यावरणपूरक शाडूच्या मातीचे गणपती बनविण्याचे प्रशिक्षण देऊन विक्रम करणार असून त्याची नोंद गिनीज बुक मध्ये केली जाईल असे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणोशोत्सव साजरा करण्यासाठी प्रेरित करण्याचा कार्यक्रम कौतुकास्पद असून जास्तीतजास्त नागरिकांनी आपला उत्सव साजरा करताना पर्यावरण रक्षण होईल याकडे लक्ष द्यावे असे ही ते म्हणाले.तसेच यासाठी मनपा सज्ज असून आज या उपक्रमाची सुरुवात झाली असे ही ते म्हणाले.क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीचे गणपती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.यावेळी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले,भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर,नगरसेवक दीपक पोटे,माणिकताई दीक्षित,सुवर्णाताई काकडे,नारायण वायदंडे इ मान्यवर यावेळी उपस्थित होते.मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या “प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती ही आपली नदी प्रदूषित करते व ती पाण्यात विरघळत नसल्याने पाणी दूषित होते,त्या मूर्तींचा विषारी रंग हा ही पाणी प्रदूषित करतो.थर्मोकोल, प्लॅस्टिकच्या किंवा इतर तत्सम शोभिवंत वस्तूंमुळे आपण पर्यावरणाचा ऱ्हास करत असून आता मुलांनीच याबाबत जनजागृती करावी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असेही त्या म्हणाल्या.सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी ” पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाची ही शाळा आदर्श शाळा करण्याकडे लक्ष द्या असे सांगून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा अशी सूचना श्री मोहोळ यांना केली,तसेच गणेशोत्सव पर्यावरणपूरक असावा यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असेही ते म्हणाले.श्री मुरलीधर मोहोळ व श्री श्रीनाथ भिमाले यांनी असे ही स्पष्ट केले कि ” विसर्जनाच्यावेळी नागरिकांचे पर्यावरण विषयक प्रबोधन करण्यात येणार असून ,निर्माल्य ही वेगळ्या पेटीत टाकण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येईल “
शाळेतील विद्यार्थ्यांना राज तांबोळी,अनुराधा एडके,कन्याकुमारी घाडगे या प्रशिक्षकांनी शाडूच्या मातीचे गणपती बनविण्याचे प्रशिक्षण दिले.मुले मूर्ती बनविण्यात हरखून गेली होती व अनेकांनी आपली कल्पनाशक्ती वापरून गणरायाच्या मूर्तीला विविध आकार दिले.आपली मूर्ती सुबक करण्यासाठी विद्यार्थी प्रयत्शील होते.
उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापिका एलिझाबेथ काकडे यांनी केले,मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक तर राज तांबोळी व अनुराधा एडके यांनी स्वागत केले.सूत्रसंचालन शर्मिला जाधव यांनी केले,