प्रती,
मा कुणालकुमार,
आयुक्त,पुणे मनपा.
विषय – कैलास स्मशानभूमीच्या दुरावस्थेबाबत –
मा महोदय,
आज कैलास स्मशानभूमीस भेट दिली असता तेथील दुरावस्था बघुन शब्दशः प्रशासनाच्या गलथान कारभाराची कीव करावी वाटली व आपण एका ” स्मार्ट सिटीत” राहतोय का एखाद्या दुर्गम भागातील पाड्यावर असे वाटावे इतकी येथील अवस्था वाईट आहे.येथील डिझेलदाहिनी २००४ साली उभारण्यात आली असुन नियमित देखभालीअभावी त्याची अवस्था दयनीय आहे.एकीकडे पर्यावरण रक्षणासाठी सर्वजण झटत असताना आणि वैकुंठ विद्युतदाहिनीत अंत्यविधी करणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना येथील दयनीय अवस्था बघता नागरिक येथे अंत्यविधीस धजावत नाहीत.
दुरावस्थेची काही उदाहरणे…
१) डिझेलदाहिनी कालबाह्य झाली असुन त्यातुन दुर्गंधी पसरते व मृतदेहातील पाणी (ड्युपाँट) बाहेर येते.सर्वत्र घाणीचे साम्राज्य आणि धूर व धुरामुळे काजळी.
२) भिंतीला तडे गेलेले असुन,बेसीनला पाणी नाही व त्यास पाईपची जोडणीच नाही असे दिसून आले.
३) लाईट फिटींग ही निखळल्या असून सीमाभिंतीला ही तडे गेले असुन ही भिंत कधीही पडेल अश्या अवस्थेत आहे.
४) तेथेच असलेली बायो गॅस वरील दाहिनी बंद असून तेथील यंत्रणा बंद अवस्थेत आहे.
५) येथे डिझेलदाहिनीला लागूनच महिन्याभरापूर्वी खोदाई केलेली असून तेथे म्हणे चिमणी उभारण्यात येणार होती / तूर्त सगळे थंड आहे.
६) ही दाहिनी बसविलेल्या चिरंतन कंपनीचे तीन वर्षापूर्वी देखभालीचे कंत्राट अचानक रद्द करण्यात आले व अन्य एका कंपनीस वार्षिक १६ लाख रुपये येवढ्या मोबदल्याचे देखभालीचे कंत्राट देण्यात आले.सदर कंत्राट एकच वर्षासाठी होते व तद्नंतर त्या कंपनीस विनंती करुन देखभाल करण्यास सांगण्यात आले.या भानगडीतच दाहिनीची दुरावस्था झाल्याचे लक्षात येते.त्यामुळे याची चौकशी होणे व दोषींवर कारवाई करणे गरजेचे आहे.
७) स्मशानभूमीच्या आवारातच एक मोठा खड्डा खण्णयात आला असुन या खड्ड्यात अस्थी विसर्जनानंतर उरलेली राख टाकण्यात येते.हे ही गैर असून त्याची पर्यायी व्यवस्था केली जावी.
तसेच सर्वत्र पडलेले भंगार ही उचलण्यात यावे अशी आग्रही मागणी करत आहे.
आपला,
संदीप खर्डेकर.
अध्यक्ष क्रीएटिव्ह फौंडेशन.
मो ९८५०९९९९९५












