नाशिक- ‘आंबे खाल्ल्याने मुले होतात’ आणि ‘संत ज्ञानेश्वर, तुकारामांपेक्षाही मनू श्रेष्ठ’ ही वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या संभाजी भिडेंविरोधात मुंबई हायकोर्टात अॅड. नितीन सातपुते यांनी याचिका दाखल केली आहे. त्यात भिडेंना भाषणे करण्यावर घटनात्मक प्रतिबंध घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे. भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य हे घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यातील तरतुदींचा भंग करत असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे.
वाशी तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतातील आंब्याचे फळ खाल्ले तर ज्यांना मुलं होत नाही त्यांना मुलं होतात, असा चमत्कारिक दावा शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी जून महिन्यात नाशिकमध्ये केला होता. हे विधान गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निवडीस प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीलाच आव्हान देणारे असल्याचे सांगत गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निवडीस प्रतिबंधक कायदा समितीचे सदस्य गणेश बोऱ्हाडे यांनी कुटुंबकल्याण कार्यालयाच्या अतिरिक्त संचालिका अर्चना पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. अशा प्रकारे वक्तव्य करणे म्हणजे गर्भलिंगनिदान कायद्याच्या कलमांचा भंग आहे. भिडे यांनी असे वक्तव्य करून कायद्याचा भंग केला असल्याने त्यांच्याविरुद्ध योग्य न्यायालयात गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही पत्रात करण्यात आली. कुटुंबकल्याण विभागाने नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्याधिकाऱ्यांना जिल्हा समुचित प्राधिकारी या नात्याने भिडे यांच्या वक्तव्याबाबत खातरजमा करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी, अहवाल तत्काळ कार्यालयास सादर करावा, असे आदेशित केले. त्यानुसार महापालिकेने चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी भिडे गुरुजी यांना नोटीस पाठवण्यात आली. मात्र, नोटीस देऊन पंधरा दिवस उलटूनही त्यास उत्तर देण्यात आले नाही. पुणे येथे पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित असलेले भिडे यांनी धारकऱ्यांना संबाेधित करताना सांगितले की, गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करून आपल्या हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला शिकवणारा मनू हा संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांपेक्षाही श्रेष्ठ होता.
गर्भलिंगनिदान कायद्यातील कलमांचा भंग
या धक्कादायक विधानांच्या विरोधात भिडे गुरुजींवर अॅड. सातपुते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आंबे खाणाऱ्याला मुले होतात या वक्तव्याने गर्भलिंगनिदान कायद्यातील कलमांचा भंग केला आहे. मनूशी संबंधित विधान हे लोकांच्या धार्मिक भावना बिघडवणारे आहे. भारतीय घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र देताना काही बंधनेही घालण्याची तरतूद केली आहे. भिडेंचे वक्तव्य या तरतुदींचा भंग करणारे आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणांवर घटनात्मक प्रतिबंध घालावा, अशी मागणी मी याचिकेद्वारे केली आहे.
– अॅड. नितीन सातपुते, याचिकाकर्ते