हिंदी सिनेजगतात १२ एप्रिल १९९६ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘साजन चले ससुराल’ चित्रपटाने अफाट लोकप्रियता मिळवली जी आजही कायम आहे. तब्बल २१ वर्षांनंतर त्या सिनेमाचे निर्माते मन्सूर अहमद सिद्दीकी यांनी या चित्रपटाचा सिक्वेल तयार करण्याची घोषणा नुकतीच एका शानदार समारंभात केली. या चित्रपटासह ‘राधे मुरारी’ या मराठी चित्रपटाची घोषणा ही यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.‘साजन चले ससुराल २’ चे कथालेखन आणि दिग्दर्शन एन. एन सिद्दीकी करणार आहेत. अनस फिल्म्स् आणि ए.ए ब्रदर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘साजन चले ससुराल २’ निर्मिती केली जाणार आहे. लवकरच या चित्रपटातील नायक, नायिका तसेच इतर कलाकारांची घोषणा करण्यात येणार आहे. या सिनेमाची कथा, पटकथा तयार झाली असून सोबत उदय टिकेकर, दाक्षिणात्य अभिनेता गुलू दादा, सोनल माँटेरीयो या कलाकारांची निवड चित्रपटासाठी करण्यात आली आहे. या हिंदी चित्रपटासोबत सिद्दीकी ‘राधे मुरारी’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. एन. एन सिद्दीकी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. लवकरच दोन्ही चित्रपटांच्या चित्रीकरणाला प्रारंभ करण्यात येणार असून ‘राधे मुरारी’ या मराठी चित्रपटात अमित रायन पाटील, गौरव घाटणेकर, उदय टिकेकर, दिपाली सय्यद, किर्ती आडारकर या कलाकारांच्या भूमिका असणार आहेत. दिग्दर्शक एन. एन सिद्दीकी यांचा ‘हिरो’ हा आगामी मराठी चित्रपटही प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.
निर्माते मन्सूर अहमद सिद्दीकी यांनी याआधी ‘साजन चले ससुराल’ या चित्रपटासोबतच ‘रंग’, ‘ताकत’, ‘दिल ने फिर याद किया’ या लोकप्रिय हिंदी चित्रपटांची निर्मिती केली आहे. डेव्हीड धवन यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘साजन चले ससुराल’मधील ‘राम नारायण बाजा बजाता…’, ‘दिल जान जिगर तुझपे निसार…’, ‘बाय बाय मिस गुड नाईट…’ आदी गाणी खूप गाजली होती. सुमधूर गीतसंगीताची हीच परंपरा पुढे सुरू ठेवत ‘साजन चले ससुराल २’च्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा संगीतप्रधान मनोरंजक चित्रपट देण्याचा सिद्दीकी यांचा मानस आहे