दिलीप कुमार यांच्या निधनाच्या धक्क्यातून पत्नी सायरा बानू अद्यापही सावरलेल्या नाहीत. उलट पतीच्या जाण्याने त्या इतक्या दुखात आहेत की त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर दिसून आला. गेल्या तीन दिवसांपासून 76 वर्षीय सायरा बानू हिंदूजा रुग्णालयातील आयसीयूत दाखल आहेत. त्यांची ऑक्सिजनची पातळी घसरली असून श्वसनाचा त्रास होत आहे.
दिलीप कुमारांच्या निधनानंतर कुणाशी बोलतही नाहीत
सद्यस्थितीला सायरा बानूंची तब्येत स्थिर असली तरीही त्यांचा रक्तदाब योग्य नाही. ऑक्सिजनची पातळी खालावलेली आहे. त्यामुळे, श्वसनाचा त्रास होत आहे. अशात त्यांना आणखी 3 ते 4 दिवस रुग्णालयातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कुटुंबियांनी सांगितल्याप्रमाणे, दिलीप कुमार यांच्या निधनापासूनच त्या जबरदस्त मानसिक धक्क्यात आहेत. त्यांनी स्वतःला सामाजिक जीवनापासून दूर केले आहे. त्या कुणाशी बोलत सुद्धा नाहीत.दिलीप कुमार उर्फ युसूफ खान यांचे 7 जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त त्यांच्या कोट्यावधी चाहत्यांसाठी धक्का होताच. पण, गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांची सावली होऊन काळजी घेणाऱ्या सायरा यांच्यासाठी हा धक्का खूप मोठा होता. या दरम्यान कित्येक वेळा दिलीप कुमार यांच्या निधनाचे वृत्तही समोर आले. पण, ते अजुनही जिवंत आहेत म्हणत त्यांना इतकी वर्षे जगते ठेवणाऱ्या सायराच होत्या. मीडियासमोर जेवढी छायाचित्रे यायची. त्यामध्ये दिलीप कुमार व्हीलचेअरवर किंवा बेडवर दिसायचे तर त्यांच्या बाजूला हसतमुखाने सायरा खंबीरपणे उभ्या दिसायच्या
सायरांनी आपले पूर्ण आयुष्य दिलीप कुमार यांची देखभाल करण्यासाठी समर्पित केले होते. स्वतः 76 वर्षांच्या असलेल्या सायरा बानू आपल्या वयाची 54 वर्षे दिलीप कुमार यांच्यासोबत होत्या. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी युसूफ यांच्याशी निकाह केला होता. आता युसूफ साहेबांच्या जाण्याने सायरा बानू यांना कुठल्याही गोष्टीत रस राहिलेला नाही. आता कुटुंबियांची अडचण अशी की त्यांचे सांत्वन कसे करावे याचे कारणही सापडत नाही

