कीर्तनभूषण ह.भ.प. पूजा देशमुख ; श्रीरामजी संस्थान तुळशीबागतर्फे भागवत एकादशीनिमित्त कीर्तन
पुणे : समर्थ रामदास स्वामींनी आदर्श जीवनपद्धती सांगितली आहे. दासबोधात याबाबत सुरेख मार्गदर्शन देखील करण्यात आले आहे. माणसाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दासबोधात मिळते. मनाच्या श्लोकांतून समर्थांनी मनाला बोध दिला आहे. असे संतांचे वाड्.मय फक्त पाठांतराकरीता नसून आचरणाकरीता आहे. ख-या अर्थाने जीवनात सकारात्मकता आणणारे संतांचे वाड्.मय आहे, असे मत ह.भ.प. पूजा देशमुख यांनी व्यक्त केले.
श्रीरामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने तुळशीबाग राम मंदिरात भागवत एकादशीनिमित्त कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त रामदास तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता.
ह.भ.प.पूजा देशमुख म्हणाल्या, हरिभक्ती आचरताना कोण काय म्हणेल, याचा विचार भक्त करीत नाहीत. हरिभक्तीत जे आपले आयुष्य सार्थकी लावतात, तेच जीव धन्यता मिळवितात. संतांच्या अनेक गोष्टी, विचार, साहित्याकडे दुर्लक्ष होत असून संतांचे वाड्.मय हीच आपली खरी संपत्ती आहे. परमार्थिक वृत्ती घडविण्याचे काम हरिभक्ती करते.
त्या पुढे म्हणाल्या, गरीबाची झोप ही ख-या अर्थाने श्रीमंत असते. मात्र, श्रीमंताला अनेक चितांमुळे झोप येत नाही. मनाचा संतोष हा हरिभक्तीमध्ये असतो. मनाचा संतोष हे आपले भाग्य, धन आणि परमेश्वर आहे. त्यामुळे जीवनात धन्यता मिळण्यास हरिभक्तीशिवाय पर्याय नाही, असेही त्यांनी सांगितले.
संतांचे वाड्.मयच जीवनात सकारात्मकता आणते
Date:

