पुणे:“ संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचे वैभव हे अद्वितीय आहे. आळंदी येथे घाटाची निर्मिती करणारे डॉ. विश्वनाथ कराड यांच्यामुळे वारकर्यांची खूप मोठी सोय झाली. पुढे ही त्यांच्या हातून येथे मोठा कायापालट होईल. आळंदी नगरपरिषदेकडून त्यांच्या सर्व कार्यांना शुभेच्छा असेल.”असे विचार आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.वैजयंताताई अशोक उमरगेकर यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रीसंत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’,विश्वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे संत शिरोमणी तत्त्वज्ञ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने लोकप्रबोधनपर आयोजित करण्यात आलेल्या जागतिक सहिष्णुता सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.या सोहळ्याला ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त श्री.योगेश देसाई, श्री तुकाराम महाराज देवस्थानचे अध्यक्ष श्री.नितीन महाराज मोरे, अशोक उमरगेकर, सौ. हेमलता काळोखे, विठ्ठल काळोखे, रमेश काळोखे, बाळासाहेब काळोखे, बबनराव कुर्हाडे पाटील, ह.भ.प. श्री. किसन महाराज साखरे यांचे पूत्र ह.भ.प. चिदंबरम महाराज साखरे, एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीच्या समन्वयक प्रा.स्वाती कराड-चाटे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
या प्रसंगी सौ.उषा विश्वनाथ कराड, माईर्स एमआयटीच्या कार्यकारी संचालिका प्रा.स्वाती कराड-चाटे, केंद्रे महाराज संस्थांचे प्रमुख ह.भ.प.श्री. विष्णु महाराज केंद्रे हे उपस्थित होते.
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ कोणतेही सामाजिक कार्य करतांना नागरिकांचा विरोध होतच असतो. परंतू आपले लक्ष विचलित करुन नये असा सल्ला मला तत्कालिन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी दिला होता. त्यांच्या या सूत्रानुसार आळंदी येथे घाटाची निर्मिती झाली. ईश्वर कृपेने बद्रिनाथ येथे ६३ दिवसात माता सरस्वती मंदिराची निर्मिती झाली. माऊलीच्या आशीर्वादाने आळंदी-देहू आज जगाच्या नकाशावर आले आहे. त्यामुळे वारकरी परंपरा संपूर्ण जगात पोहचली आहे.”
ह.भ.प.श्री. विष्णु महाराज केंद्रे म्हणाले,“ कोणतेही कार्य करतांना अहंकार येऊ देऊ नका. ज्ञान आणि निष्ठेने कार्य करणारे डॉ. कराड यांनी बद्रिनाथ येथे दिव्य भव्य मंदिर उभे केले. विज्ञान आणि अध्यात्माची जोड देऊन त्यांनी जगाला नवी ओळख करुन दिली आहे. तसेच माऊलींचा संदेश आणि तत्त्वज्ञान जगभर पसरविण्याचे कार्य ते करीत आहेत.”
हेमलता काळोखे म्हणाल्या,“कोरोना काळामध्ये जी पोकळी निर्माण झाली होती ती आज वारकर्यांच्या उपस्थितीने भरुन निघाली आहे. माऊलींच्या आशीर्वादानेच ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. ”
ह.भ.प.चिदंबर महाराज म्हणाले,“विवेकपूर्ण ज्ञान संपदेसाठी अध्ययन हेच सर्वात महत्वाचे आहे. माऊलींनीही अध्ययनावर भर देऊन शेवटच्या व्यक्तीपर्यंत ज्ञान पोहचविण्याचे कार्य केले. जेथे संपत्ती आणि दया असते तेच विभूती असते आणि हे डॉ. कराड यांच्या रुपाने मिळाले आहेत.”
प्रा.स्वाती कराड चाटे म्हणाल्या,“आळंदी देहू परिसर विकास समितीची स्थापना झाल्यानंतर येथे घाटाची निर्मिती झाली आहे. तसेच, लोक शिक्षणपर कार्यक्रम चालवून येथे येणार्या वारकर्यांना मार्गदर्शन केले जाते. कोरोनाच्या काळानंतर पुन्हा ही भूमी वारकर्यांच्या चैतन्य ऊर्जेने भरलेली आहे. आता पुन्हा नवी उमेद मिळत आहे.”
नितीन महाराज मोरे व भानुदास महाराज यांनी ही आपले विचार मांडले. त्यानंतर इंद्रायणी मातेची आरती झाली.
श्री.शालीकराम खंदारे यांनी सूत्रसंचालन व महेश महाराज नलावडे यांनी आभार मानले.
संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचे वैभव अद्वितिय -नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर
Date:

