पाणी फाउंडेशनची सक्रिय कार्यकर्ती असलेल्या अभिनेत्री सई ताम्हणकरने महाराष्ट्रदिनी पुण्याजवळच्या सुकळवाडी गावात श्रम केले. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी सई ताम्हणकर गेली तीन वर्ष कार्यरत आहे.
यंदा सुकळवाडीत गेलेल्या सईला श्रम केल्यानंतरच्या अनुभवाविषयी विचारल्यावर ती म्हणते, “दरवेळी श्रम करण्यासाठी स्वेच्छेने सहभागी होणा-या कार्यकर्त्यांची संख्या वाढतेय. आणि महाराष्ट्राच्या मातीची नव्या पिढीला ओढ लागतेय, हे पाहून मला खूप छान वाटतंय. इथे कुटूंबच्या कुटूंब येऊन श्रम करताना मी पाहते आहे. त्यातल्या एका शहरी कुटूंबप्रमुखाने श्रमकरते वेळी मला सांगितलं, की, मी शेतक-याचा मुलगा असल्याने श्रमाचे महत्व मला आहे. पण माझ्या मुलीला पाणी कुठून येतं विचाराल तर ती सांगेल की नळातून. हे ऐकायला तात्पूरतं मजेशीर वाटलं तरीही हे भयाण सत्य आहे. त्यामूळेच आपल्या मातीची ओढ लागावी. म्हणून मी तिला श्रम करण्यासाठी घेऊन आलोय”
सई पूढे म्हणते, “ही प्रतिक्रियाच सांगते, की आजचे पालक आपल्या मुलांना पून्हा एकदा मातीची ओढ लावू पाहता आहेत. आणि हे जर श्रम करण्याने शक्य होत असेल, तर पाणी फाऊंडेशन नक्कीच यशस्वी ठरतेय असं मला वाटतं.”
ती पूढे सांगते, “1 मेच्या दिवशीच लग्न असलेलं एक जोडपं श्रम करायला आलं होतं. त्याचप्रमाणे मी यावेळी अगदी सात वर्षांच्या लहानग्यांना आणि सत्तरी पार केलेल्या आजी-आजोबांनाही धडाडीने कुदळ फावडे हातात घेऊन काम करताना पाहिलं आणि श्रम करण्याचा हुरूप अजूनच वाढला. एक आगळं समाधान घेऊन मी त्या गावातून परत आली आहे.”