पिंपरी
देवा, तू माझे आजपासून आयुष्य घे….मात्र, 2050 चा विकसित भारत पाहण्यासाठी एक दिवस मला पृथ्वीवर येऊ दे…अत्यंत भावूक होत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेकर यांनी ईश्वराकडे हे मागणे मागितले अन् क्षणभर अवघे साहित्य रसिकही हळवे झाले. मराठी भाषेचे जतनच नव्हे, तर संवर्धन व्हावे, अशी अपेक्षाही डॉ. माशेलकर यांनी या वेळी व्यक्त केली.
पिंपरीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात डॉ. रघुनाथ माशेलकर यांची मुलाखत ‘जडण-घडण’ मासिकाचे संपादक डॉ. सागर देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार अभय जेरे यांनी घेतली. त्यावेळी त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली.
डॉ. माशेलकर म्हणाले, डॉ. माशेलकर म्हणाले, मोठे तंत्रज्ञान निर्माण करीत असताना ते सर्वसामान्यांपर्यंत कसे पोहोचेल, याचा विचार आपण करायला पाहिजे. मोदींच्या ‘स्टार्ट अप इंडिया’ने गरिबांसाठी तंत्रज्ञान विकसित करावे. ज्यावेळी भारत विकसित देशांच्या यादीत जाईल, त्यावेळी प्रत्येकाच्या चेहऱयावर हास्य असायला हवे. पण, मला एक खंत असेल. विकसित भारत पाहण्यास मी नसेल. देवाने मला काय पाहिजे, असे विचारले, तर ‘तू माझे आजपासूनचे आयुष्य घे. पण 2050 च्या विकसित भारतात एका दिवसासाठी मला पृथ्वीवर येऊ दे,’ असे मागणे मागेन, असे सांगत डॉ. माशेलकर भावूक झाले.
मराठी भाषा टिकवणे महत्त्वाचे आहे. त्या भाषेविषयी आपल्या सर्वांना आत्मविश्वास वाटणे महत्त्वाचा आहे. मराठी माध्यमातील शाळा किंवा पालिकेच्या शाळा बंद होत आहेत, त्या टिकल्या पाहिजेत. मी अकरावीपर्यंतचे शिक्षण मराठीतून घेतले. माझे काही बिघडले नाही. मराठी भाषेचा उपयोग ज्ञानाधिष्ठीत समाजरचनेत कसा करता येईल, हे पाहणे गरजेचे आहे. मराठी भाषेचे जतनच नव्हे, तर संवर्धन करावे. आपली भाषा प्रभावी, संपन्न, लवचिक, नवनिर्मितीची क्षमता असणारी असली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
आपण जिंकू शकतो, हा आत्मविश्वास आपल्यात निर्माण व्हायला हवा. आपल्या कल्पना, संपत्तीचा देशाला लाभ व्हावा. देशातील कंपन्यांनी परदेशातील कंपन्यांना आपल्या कल्पना द्याव्यात. आपल्या सर्वांमध्ये प्रचंड क्षमता आहे. फक्त, आपण त्याचा वापर करीत नाही. त्याचा वापर केल्यास आपल्याला एकाच वेळी अनेक गोष्टी करता येईल, असेही त्यांनी सांगितले.