पुणे- महाराष्ट्राला सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक प्रकारच्या चळवळीचा वारसा लाभला आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर देशाचे नेतृत्व करण्याची ताकद केवळ महाराष्ट्राकडे आहे, असे मत केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी व्यक्त केले.
संमेलनाचे सोमवारी सूप वाजले. त्या वेळी राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे, कवी जावेद अख्तर, स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.
देशात विचारभिन्नतेचा नव्हे, तर विचारशून्यतेचा प्रश्न आहे. काही डावेही नसतात आणि उजवेही नसतात. केवळ प्रवाहासोबत जाऊन आलेली संधी देण्याची साधण्याचे काम ते करीत असतात. जे प्रामाणिकपणे आपली भूमिका मांडतात. भूमिकेवर ठाम असतात. तेच प्रवाहाच्या विरोधात पोहू शकतात, असेही त्यांनी सांगितले. साहित्यिकांनी सामाजिक, राजनैतिक साहित्य दिले आहे. पण, सध्याचे जग बदलत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, शेती, उद्योग, जैवतंत्रज्ञानात मोठी प्रगती होत आहे. त्यामुळे याचे प्रतिबिंब साहित्यात उतरणे गरजेचे आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या वेळी बोलताना जावेद अख्तर म्हणाले, आजघडीला एक भाषा हीच दुसऱया भाषेसाठी ‘दीवार’ बनत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या भाषांचा अनुवाद होणे गरजेचे आहे. त्यातही मराठीतील दर्जेदार साहित्याचा अनुवाद झाला पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी येथे व्यक्त केली. अख्तर म्हणाले, समाजाची आकांक्षा समजण्यासाठी भाषा बनली आहे. भावना विचार हा दृष्टीकोन समजण्यासाठी भाषेचा उपयोग होतो. पण, भाषा हीच संवादामध्ये अडथळा बनत आहे. पण, त्यामध्येही एक खिडकी आहे. ती म्हणजे अनुवादाची. मराठीमध्ये दर्जेदार साहित्याचा अनुवाद कमी झाला आहे. दर्जेदार साहित्याचा अनुवाद होणे गरजेचे बनले आहे.
डॉ श्रीपाल सबनीस म्हणाले, संमेलनात केवळ बेळगावचा ठराव करून भागणार नाही. सीमाभागातील जनतेला जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही अन्यायकारक वागणूक दिली जात असून, ही असहिष्णुताच आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीत हा प्रश्न आता सुटायला हवा. राज्य सरकारने त्यासाठी पुढाकार घेऊन कोर्टाबाहेर हा तिढा सोडण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अथवा सीमाभाग केंद्रशासित करण्याची भूमिका घ्यावी. हे शक्य आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांना त्यांनी हे कोडे घालावे व एकदाची या प्रश्नाची सोडवणूक करावी, अशी सूचना त्यांनी केली.
गोव्यामध्ये जवळपास 11 दैनिक मराठी आहेत. मोठय़ा प्रमाणात तिथे मराठी बोलली, वाचली जाते. कोणत्याच बोलीला माझा विरोध नाही. त्यामुळे कोकणीबद्दल प्रेम व आदरच आहे. मात्र, कोकणीबरोबरच मराठीलाही तेथे राज्यभाषेचा दर्जा मिळायला हवा. त्यासाठी गोवा सरकारला साकडे घालण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी विनोद तावडे यांच्याकडे केली.