मुंबई-सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी एसटी संपकऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांची आज पोलिस कोठडी संपली. त्यानंतर त्यांना आज गिरगाव न्यायालयात हजर करण्यात आले असून सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव न्यायालयातून आर्थर रोड कारागृहात नेले जात आहे. याचदरम्यान सातारा पोलिसही सदावर्तेंचा आर्थर रोड कारागृहातून ताबा घेण्यासाठी प्रयत्नशिल आहे.
सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणातील संशयित गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव न्यायालयाने आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी होणार आहे. तत्पुर्वी ”सातारा पोलिसांनी ताबा देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती, ती विनंती न्यायालयाने मान्य करून आर्थर रोड कारागृहातून सदावर्ते यांचा ताबा घ्यावा असेही आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. सातारा पोलिसांना 17 एप्रिलपर्यंत ताबा घेता येणार असून तशी परवानगीही पोलिसांना न्यायालयाकडून देण्यात आली आहे.
चंद्रकांत सुर्यवंशी,अभिषेक पाटील यांना पोलिस कोठडी
चंद्रकांत सुर्यवंशी आणि अभिषेक पाटील यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. आज एकूण 10 संशयित आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सदावर्ते, पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशी यांना पोलिस कोठडी द्यावी. न्यायालयाकडे मागितली आहे. त्यानंतर सदावर्तेंच्या वकीलांनी बाजू मांडली. दोन्ही युक्तिवाद पुर्ण झाल्यानंतर सदावर्तेंना यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली तर इतर दोघांना 16 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयात युक्तिवादाला सुरुवात केली. तेव्हा सिल्व्हर ओक आंदोलन प्रकरण नागपूर येथील व्यक्ती ऑपरेट करीत होती असा त्यांनी खुलासा केला, पण ती व्यक्ती कोण हे त्यांनी मात्र सांगितले नाही. ही सर्व माहिती पोलिसांच्या तपासातून समोर येत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी न्यायालयाकडे सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली पण त्यांची मागणी न्यायालयाने मान्य केली नाही.
असा केला घरत यांनी युक्तिवाद
- सिल्व्हर ओक आंदोलन प्रकरण नागपूर येथील व्यक्ती ऑपरेट करीत होती.
- सीसीटीव्ही फुटेज तपासले. 11 आंदोलक दारु प्यालेले होते.
- दारु कुणी पाजली याचा शोध घ्यायचा आहे.
- सदावर्तेंनी पैसे गोळा केले अन् ते कुठे व कसे वळले याचा शोध घ्यायचा आहे.
- दोन कोटी रुपयांची रक्कम गोळा करून सदावर्ते यांनी जयश्री पाटील यांच्याकडे दिली.
- आंदोलनापूर्वी सदावर्तेंच्या घराच्या गच्चीवर मिटींगमध्ये नागपूरची व्यक्ती होती.
- सदावर्तेंची पत्नी फरार असल्याचा दावा
सदावर्तेंच्या वकीलांचा न्यायालयातील युक्तिवाद
- गुन्हा दाखल केला हल्ल्याचा आता म्हणतात आर्थिक घोटाळा झाला.
- तपास योग्य पद्धतीने होत नाही.
- नागपूरच्या व्यक्तीचा कोणताही पुरावा दिला नाही, पोलिसांनी स्टोरी आधीच रंगवली.
- एकही पुरावा तपास यंत्रणेकडे नाही.
- सदावर्तेंची कोठडी एकमेव मागणीऐवजी पुरावे द्यावा.
- जयश्री पाटील सदावर्तेंची पत्नी आहे म्हणून लक्ष केले जात आहे.

