मुंबई-आज राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भास्कर जाधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्याने विरोधकांनी एकच गदारोळ घालण्यास सुरुवात केली. यामुळे जाधवांना माफी देखील मागावी लागली. मात्र यानंतर काँग्रेसचे नेते सचिन सावंतांनी ट्विट करत भाजपला टोला लगावला आहे.काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक जुना व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नक्कल करत असल्याचे दिसत आहे. मोदींचा आदर्श विसरलेल्या भाजप नेत्यांच्या प्रबोधनासाठी मोदींचा संस्थेमधील कलाविष्कार सादर करत आहोत असे ट्विट सचिन सावंतांनी केले आहे.
सचिन सावंत ट्विटमध्ये म्हणाले की, ‘विधानसभेत अंगविक्षेप केले असा आरोप करत शिवसेना नेते भास्कर जाधवांनी माफी मागावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांनी करून हक्कभंग आणण्याची धमकी दिली. मोदींचा आदर्श विसरलेल्या भाजप नेत्यांच्या प्रबोधनासाठी मोदींचा संस्थेमधील कलाविष्कार सादर करत आहोत.’
काय आहे प्रकरण?
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजेच्या प्रश्नावर बोलताना कोरोना काळ आल्याने वीज माफीचे आश्वासन पूर्ण झाले नाही असे म्हटले. यानंतर भास्कर जाधव यांनी पुनरुच्चार करून पंतप्रधानांची नक्कल करून दाखवली. यावरच संतप्त देवेंद्र फडणवीस म्हणाले, सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. भास्कर जाधव यांनी आक्षेपार्ह अंगविक्षेप करून पंतप्रधानांचा अपमान केला आहे. त्यांनी सभागृहात माफी मागावी. त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे निलंबन करण्यात यावे असा आक्रामक पावित्रा फडणवीस यांनी घेतला. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी देखील भास्कर जाधव यांच्या बोलण्यावर आपला आक्षेप नोंदवून कारवाईची मागणी केली. यानंतर नितीन राऊतांना माफी मागावी लागली.

