पुणे, दि. 30: जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या राजुर (ता. जुन्न्र ) धामारी (ता. शिरूर) जळगाव क. प. (ता. बारामती) या तीन आयुष्मान आरोग्य मंदिरांना (आयुष) राष्ट्रीय पातळीवरील एनएबीएच मानांकन प्राप्त झाले असून, ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे. एनएबीएच हे गुणवत्ता परिषदेअंतर्गत कार्यरत मंडळ असून, रुग्णालये व आरोग्य संस्थांना रुग्ण सुरक्षितता व सेवेच्या गुणवत्तेच्या कठोर मानदंडांनुसार मान्यता देते
एनएबीएच समितीच्या तज्ज्ञांमार्फत आयुष्मान आरोग्य मंदिरांची सखोल तपासणी करण्यात आली होती. मानांकनासाठी आवश्यक सर्व निकष पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतींच्या सहकार्याने विविध आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली, आरोग्य केंद्रांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी NABH मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व नोंदी अद्ययावत ठेवल्या. स्वच्छता व साफसफाईवर विशेष भर देण्यात आला असून, हर्बल गार्डन तयार करून परिसराचे सुशोभीकरणही करण्यात आले. यासोबतच ग्रामस्थांकडून अभिप्राय घेण्यात आला.
सर्व पात्रता निकषांची यशस्वी पूर्तता झाल्यानंतर या तीनही संस्थांना एनएबीएच मानांकन प्राप्त झाले आहे. या कार्यासाठी मा.गजानन पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.रामचंद्र हंकारे जिल्हा आरोग्य अधिकारी, यांचे शुभहस्ते डॉ.बालाजी लकडे जिल्हा आयुष अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित प्रदान करण्यात आला.
आयुष्मान आरोग्य मंदिरांमार्फत आयुष अभियानांतर्गत विविध आजारांवर आयुर्वेद उपचार, आरोग्यदायी जीवनशैलीसाठी योग व प्राणायाम सत्रे, आयुर्वेदोक्त दिनचर्या व ऋतुचर्येबाबत मार्गदर्शन तसेच सामान्य आजारांवर उपयोगी आयुर्वेदिक वनस्पतींच्या वापराबाबत माहिती पुस्तिकांचे वाटप करण्यात येते.
विशेष म्हणजे, या तीनही संस्था पुणे जिल्ह्यात एनएबीएच मानांकन प्राप्त करणाऱ्या पहिल्या आयुष आरोग्य संस्था ठरल्या असून, जिल्ह्याच्या आरोग्य सेवेच्या गुणवत्तेत हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे

