स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : पुणे ज्याप्रमाणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, त्याप्रमाणे भविष्यात साताराही सांस्कृतिक केंद्र व्हावे, महाराष्ट्र सरकारकडून मराठी भाषेचे विद्यापीठ रिद्धपूर येथे सुरू झाले आहे. त्याचे उपकेंद्र साताऱ्यात व्हावे, सातारा शहराला ऐतिहासिक पर्यटन नगरीचा दर्जा मिळावा, मराठा साम्राज्याचा समग्र इतिहास साताऱ्याच्या अजिंक्यताऱ्यावर उभा करावा, श्री. छ. शाहू महाराज यांच्या स्मारकासोबतच श्री. छ. प्रतापसिंह महाराज यांचेही स्मारक व्हावे, अशी समस्त सातारकरांची आग्रही मागणी असल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेनलाचे स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उद्घाटन समारोहात बोलताना सांगितले.
साताऱ्याचा इतिहास गौरवशाली आहे, वर्तमान समृद्ध आहे आणि भविष्यही आशादायी आहे. कृष्णाकाठच्या या ऐतिहासिक भूमीने उत्कट भव्य तेचि घ्यावे’ या समर्थ रामदासांच्या वचनाला कायम शिरसावंद्य मानले, हे इतिहासात डोकावले तर आपल्याला दिसते. इतिहासाचा संपन्न वारसा साताऱ्याने अभिमानाने मिरवला. व्यवस्थेशी दोन हात करणारी अशी ही साताऱ्याची माती आहे. इंग्रजांविरुद्ध शड्डू ठोकण्याचं काम तत्कालीन देशभक्त, क्रांतिकारकांनी केले. पुढे हीच परंपरा तिन्ही सैन्यदलांमध्ये गेले अनेक दशके लढणाऱ्या असंख्य सातारा जिल्हावासीयांनी दाखवली. साहित्य संमेलनाच्या या व्यासपीठावरून स्वराज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी आणि देशासाठी लढणाऱ्या हजारो ज्ञात-अज्ञात हातांचे स्मरण आवश्यक आहे. लेखनाच्या, काव्याच्या क्षेत्रातही साताऱ्यातील नररत्नावली अतिशय दीर्घ अशा परंपरेची आहे.
संस्कृत आणि मराठी भाषांसाठी इथल्या मातीतील शब्द वापरण्याची गरज सर्वांत पहिल्यांदा शिवछत्रपतींनी व्यक्त करून ‘राज्यव्यवहार कोशा’ची निर्मिती केली. शिवछत्रपतींच्या आज्ञेवरून यवनी शब्दांचा आपल्या स्वभाषेत एक कोश करण्यात आला. हा ‘राज्यव्यवहारकोश’ पूर्ण झाल्यानंतर शिवछत्रपतींनी तो नजरेखालून घातला असावा, असे अनेक इतिहासतज्ज्ञांचे मत आहे. शिवछत्रपतींना केवळ राज्य स्थापन करायचे नव्हते, तर नूतन सृष्टी निर्माण करायची होती. मरगळ आलेले समाजजीवन पुन्हा चैतन्यमय करण्यासाठी शिवाजी महाराजांनी हा कोश तयार केला होता. मराठीसह स्थानिक भाषांसाठी त्यांचा आग्रह होता आणि ओघानेच साहित्यनिर्मितीलाही त्यांचे प्रोत्साहनच होते. मराठी, संस्कृत या भारतीय भाषांना राजभाषेचा दर्जा मिळावा म्हणून महाराजांनी केलेले प्रयत्न वाया गेले नाहीत. शिवरायांनी घातलेला पायंडा पुढच्या पिढ्यांनी सांभाळला.
मुघलांच्या सत्तेविरोधात सडेतोड प्रहार करणारे, चंचल मनाला उपदेश करणारे राष्ट्रसंत समर्थ रामदास यांचे आद्यस्मरण करणे अतिशय महत्त्वाचे आहे. देशभर भ्रमंती करून सज्जनगडावर देह ठेवलेल्या रामदासस्वामींनी केलेली साहित्यनिर्मिती अनेक शतकांनंतर ही आपल्यासाठी मार्गदर्शक आहे. रोजच्या जगण्यातील तत्त्वज्ञानासह राष्ट्रउद्धारासाठी समर्थांनी दिलेले योगदान विसरता न येण्याजोगे आहे. साताऱ्याच्या छ. शाहू महाराजांनीही सातत्याने साहित्य संस्कृतीच्या विस्तारासाठी आणि लोकशिक्षणासाठी प्रयत्न केले.
छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी अनेक ग्रंथ लिहून घेतले, छापखाना सुरू केला, मुलींसाठी शिक्षणाची व्यवस्था केली. शिवाय स्वतःच्या संग्रहातील पुस्तके देऊन ग्रंथालय सुरू केले. त्यातूनच आज साताऱ्यात दीडशे वर्षे परंपरा असलेल्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालयाचा जन्म झाला. धावडशीचे ब्रह्मेंद्रस्वामी, त्रिपुटीचे गोपालनाथ, पुसेगावचे सेवागिरी महाराज, गोंदवल्याचे ब्रह्मचैतन्य महाराज यांनी आध्यात्मिकतेतून रोजच्या जगण्याचे मर्म आपल्या लेखणी आणि वाणीतून सांगितले अन् आध्यात्मिक बैठक दिली. रामदास पंचायतनमधील जयरामस्वामी, भोगांवचे वामन पंडित, रंगनाथस्वामी निगडीकर यांचेही योगदान बहुमोल होते.
शिक्षण, समाजकारण, साहित्य या क्षेत्रांत उभे आयुष्य वेचणाऱ्यांमध्ये सामाजिक सुधारणेचे अग्रणी महात्मा फुले यांचा समावेश होतो. त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगावही खंडाळा तालुक्यातील नायगाव. या दोघांनी शिक्षणाची कवाडे मुलींसाठी उघडण्याचे केलेले कार्य वंदनीय आहे, यात शंका नाही. शिक्षणाची गंगा घरोघरी नेणारे आणि रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचा सर्वदूर प्रसार करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांचेही स्मरण केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. साताऱ्याच्या मातीत घडलेल्या, काही काळ वास्तव्य असलेल्या सारस्तवतांनी सरस्वतीच्या दरबारात रुजू केलेली साहित्यसेवा मोलाची आहे, यात शंका नाही. आज साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या सारस्वतांचे स्मरण करणे आवश्यक आहे. साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्याच्या साहित्य-सांस्कृतिक जडणघडणीत औंध संस्थानाचा उल्लेख करणेही आवश्यक आहे.
साताऱ्याच्या ऐतिहासिक, साहित्यिक पार्श्वभूमीच्या धावत्या स्वरूपाच्या आढावा घेऊन छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, साताऱ्याला संमेलन देण्यासाठी आग्रही भूमिका मी घेतली. दरम्यानच्या काळात साताऱ्यात साहित्य-संस्कृतीविषयक विविध कार्यक्रम सुरू होते. जिल्ह्यात छोटी-मोठी संमेलने, साहित्यविषयक कार्यक्रम होत गेले. यामागे साताऱ्याचा सांस्कृतिक विकास व्हावा, हाच हेतू होता. मूलभूत आणि औद्योगिक विकास होतो, त्याचप्रमाणे साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रातही आपण काही भरीव काम करायला हवे, या उद्देशाने कार्यरत राहिलो.
वाचन संस्कृतीची जडणघडण
गेल्या काही दशकांत साहित्य-संस्कृतीसाठी पोषक आणि आश्वासक वातावरण तयार होण्यासाठी अनेक संस्था जिल्हाभर अथक प्रयत्न करीत आहेत, विविध उपक्रम घेत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये मूळच्या साताऱ्याच्या साहित्यिकांची स्मारके उभारून महाराष्ट्र साहित्य परिषदेने महत्त्वाचं काम केलं आहे. शाखेमार्फत मर्ढे येथे कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांचे स्मारक उभारले आहे. वसंत कानेटकर, कवी यशवंत यांची स्मारकेही मार्गी लागली आहेत. याशिवाय विविध संघटनांतर्फे छोटी साहित्य संमेलने, व्याख्यानमाला यांचेही आयोजन करीत आहेत, हे चित्र नक्कीच आशादायी आहे.
अभिजात मराठीसाठीचा लढा
साहित्य संमेलनासाठी पाठपुरावा करीत असताना मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्धार आम्ही केला. साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या समवेत दिल्ली येथे धरणे आंदोलन केले. अभिजात मराठीसाठी उभारलेल्या लढ्याला यश आले. केंद्र सरकारने मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ दिला. हा दर्जा मिळाल्यानंतरचं पहिले महाराष्ट्रातील संमेलन साताऱ्यात होत आहे, हीदेखील एक महत्त्वाची बाब आहे.
भविष्यातील वाटचाल
साताऱ्याच्या साहित्यिक सांस्कृतिक विकासात साहित्य संमेलन झाले म्हणजे संपले, असं मुळीच नाही. संमेलन हा या वाटचालीतील पहिला टप्पा असून, आता यापुढची वाटचालही अतिशय महत्त्वाची असणार आहे. महाराष्ट्र सरकारकडून मराठी भाषेचे विद्यापीठ रिद्धपूर येथे सुरू झाले आहे. त्याचे उपकेंद्र साताऱ्यात होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपकेंद्र साताऱ्यात सुरू करण्याचा माझा प्रयत्न आहे. स्वराज्यरक्षक संभाजीपुत्र श्री. छ. शाहूंच्या कार्यकाळात मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकावले. मात्र, आजपर्यंत त्यांच्या कार्याची योग्य दखल घेतली नाही. आतापर्यंत महाराष्ट्राने श्री. छ. शाहूंवर अन्यायच केला. साहित्य संमेलन नगरीला स्वराज्य विस्तारक शाहू महाराज नगरी, असे नाव दिले आहे.
साताऱ्याचा पाहुणचार कंदी पेढ्यासारखा गोड आहेच, पण त्या गोडव्यामागे संघर्षाची धारही आहे. येथून जाताना केवळ आठवणी घेऊन जाऊ नका, तर मराठी भाषेच्या संवर्धनाचा एक नवा विचार आणि जिद्द घेऊन जा. साहित्याची ही पालखी आपण सर्वांनी मिळून पुढे नेऊया.

