माय मराठीसाठी लढाई प्रत्येकाच्या उंबरठ्यावर : विश्वास पाटील
देव्हाऱ्यात विठोबा, ज्ञानेश्र्वर, तुकाराम हवे असल्यास वेळीच जागे व्हा : विश्वास पाटील
सातारा : या देशाच्या भूत-भविष्याच्या विचाराला आरंभ होण्याआधी मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या गाभ्याला साहित्य संमेलनाने हात घातला आहे. मायमराठीच्या अस्तित्वाची लढाई आता आपल्या प्रत्येकाच्या उंबरठ्यावर येऊन पोचली आहे. उद्या तुमच्या देव्हाऱ्यावर विठोबा समवेत ज्ञानेश्वर आणि तुकारामाच्या प्रतिमा टिकाव्यात असे वाटत असेल, तर वेळीच झोपेतून जागे व्हा. तुमच्या खांद्यावर झेंडा कोणत्याही जातीचा, पक्षाचा वा धर्माचा असुदे. त्याचा दांडा हा मराठीच असायला हवा. तुमच्या खांद्यावर पालखी कोणाचीही असुदे तिचा गोंडा मराठीच असायला हवा, अशी आग्रही भूमिका ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी मांडली.
धान्य पिकवणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पत्नीचा व मातेचा गौरव व्हायला पाहिजे. त्यासाठी ‘लढाऊ धरतीमाता’ नावाची नवी योजना हाती घ्यावी, माफक दरात पुस्तक विक्रीच्या दुकानांना परवानगी द्यावी, ग्रंथालये, मराठी शाळा टिकविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, महाराष्ट्रातच माय मराठीचे अध:पत होऊ नये या करीता सर्व स्तरांवर प्रयत्न व्हावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
साहित्य संमेलन म्हणजे केवळ हौशागौशांची जत्रा नसते, कोणा वधू-वरांच्या लग्नाचे ते वऱ्हाडही नव्हे; तर महाराष्ट्राच्या साहित्य, संस्कृती आणि अस्तित्वाला आकार व दिशा देणारी सर्वमान्य अशी प्रागतिक संघटना म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होय, असे सांगून विश्वास पाटील पुढे म्हणाले, लेखक किंवा कवीला कोणतीही जात नसते. मात्र त्याला धर्म असतो. जो धर्म असतो तो फक्त मानवता धर्म! जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते. तेव्हा-तेव्हा गेल्या दोनशे वर्षात सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. कवीच्या हृदयातून आलेले सच्चे शब्द प्रसंगी सत्तेच्या सिहांसनासमोर झुकत नाहीत, हे या भूमितल्या साहित्यिकांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे.
मराठीचे दालन दलित आत्मचरित्रांनी आणि कवितांनी, तसेच भटक्या विमुक्तांच्या कसदार लेखणीने समृद्ध केले आहे. महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदा आणि ग्रामीण भागातून अनेक कवयित्री आणि बालसाहित्यातील मंडळी साहित्य शारदेच्या दरबारात जोमाने पुढे येऊन भर घालताना दिसतात.
महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता घोषित झाली आहे. तुमची आचारसंहिता असेल तर आमची विचारसंहिता असते! तुमच्या आचारसंहितेची मुदत फक्त चारदोन आठवड्यांपुरती असते, तर साहित्य संमेलनाच्या मंथनातून निघालेल्या विचार शलाकांचा अंमल चार चार दशके सुद्धा टिकून राहतो हा या भूमीचा इतिहास आहे.
या संमेलनाचा अध्यक्ष या नात्याने ही संधी देशाच्या आझादीसाठी आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झुंज दिलेल्या एका कार्यकर्त्याच्या मुलाला मिळाली आहेच. पण त्याही पेक्षा एका अशिक्षित शेतकरी मातेच्या लेकरांकडे हे पद चालून आले आहे या गोष्टीचा मला अतिशय आनंद वाटतो. माझ्या साहित्यिक कारकीर्दीचा विचार करताना मला हाच प्रश्न पडतो, मी नेमका कोण आहे? झाडाझडती, लस्ट फॉर मुंबई, नागकेशर, दुडिया, अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान सारखी ग्रंथ संपदा लिहिणारा सामाजिक लेखक? की ऐतिहासिक कादंबरीकार? उजवा की डावा? माझ्या मते I am neither left, nor right, but I am upright. मी डावाही नाही आणि उजवाही नाही. मात्र माझ्या हाती मानवतेचे निशाण आहे. माझ्यातल्या कादंबरीकाराला सातारच्या सकस मातीने घडवले आहे ही वस्तुस्थिती आहे.
१८७८ मध्ये जे आमचे पहिले मराठी साहित्य संमेलन झाले, ज्याचा उल्लेख महात्मा फुल्यांनी ‘घालमोड्यादादांचे संमेलन’ असा उल्लेख नेहमी टाळीच्या एका वाक्यासाठी केला जातो. त्याच्या पल्याड खोलवर जाऊन तत्कालीन परिस्थितीचा अधिक गांभीर्याने विचार करायला हवा.
न्यायमूर्ती रानडे यांनी वयाच्या ३८व्या वर्षी साहित्य संमेलनाचा घाट घातला नंतर बावीस वर्षानी याच महादेव गोविंदानी ‘मराठा सत्तेचा उदयास्त’ नावाचा मौलिक ग्रंथ लिहून प्रबोधनाला खऱ्या अर्थी इथे चालना दिली. देशाच्या आझादीचे आंदोलन असो की, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ किंवा नामांतराचा लढा अगर आणीबाणी सारखा प्रसंग. प्रत्येक ऐतिहासिक आणि निर्णायकी वळणावार मराठी साहित्य संमेलन चार पावले आघाडीवरच राहिले आहे.
सातारा प्रांत म्हणजे साहित्यरत्नांच्या खाणी …
सातारा प्रांत म्हणजे एकीकडे इतिहासाच्या धडाडत्या तोफा आणि चौघडे आणि दुसरीकडे लोकसाहित्याचा पदन्यास… घुंगरांचा खणखणाट. सातारा प्रांत म्हणजे खऱ्या अर्थी साहित्यरत्नांच्या खाणी आहेत. ऐतिहासिक साताऱ्याची भूमी म्हणजे, निरा नदीच्या खळाळत्या पाण्यापासून ते पल्याड कोल्हापुराकडे वारणेच्या जलप्रवाहापर्यंत, तसेच एका बाजूला महाबळेश्वराच्या पर्वतरांगा आणि खाली पूर्वेकडे माणदेश-आटपडी ते पलीकडे मिरज, कवठे महांकाळ पर्यंत पसरलेला जुना विस्तीर्ण मुलुख आमच्या डोळ्यासमोर उभा रहातो. हीच ती पुण्यभूमी, जी थोरल्या शाहू महाराजांच्या वास्तव्याने महतपदास पोचली होती. याच भूमीतले महादजी शिंदे जे दिल्लीचे पाटीलबाबा बनले होते आणि ज्यांच्या इशाऱ्यानुसार हिंदुस्थानच्या गादीवर अर्धा डझन मुघल बादशहा बसले होते. छत्रपती शिवरायांच्या जीवनावर अप्रतिम आणि अजरामर काव्य रचना करणारे संत रामदास स्वामी, सातारच्या वैभव आणि स्वायत्ततेसाठी ब्रिटिशांशी संघर्षाचं रान पेटवणारे थोरले प्रतापसिंह महाराज, त्या प्रजाहितदक्ष राजाची कैफियत मांडण्यासाठी इंग्लंडमध्ये धाव घेणारे, तिथे जाऊन नव्याने इंग्रजी शिकून आपल्या वक्तृत्वाने ब्रिटिशांची पार्लमेंट हादरवून टाकणारे रंगो बापूजी गुप्ते, ज्यांनी जगाला ‘राजा मेला तरी न्याय मेला नाही माझ्या सातारच्या गादीला न्याय मिळालाच पाहिजे’ अशा सिहंगर्जना इंग्लंडमध्ये केल्या होत्या. ब्रिटिशांच्या विरोधात रानावनात स्वतःचे गरिबांचे राज्य या भूमीत निर्माण करणारा आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक. ब्रिटिश साम्राज्याला हादरा देणारे प्रती सरकार निर्माण करणारे आमचे क्रांतीसिह नाना पाटील, जी डी लाड, नागनाथ नाईकवडी ते किसन वीर, धनिणीच्या बागेत रयत शिक्षण संस्था स्थापन करून शैक्षणिक क्रांति घडवणारे आमचे कर्मवीर भाऊराराव पाटील. तसेच इतिहासाच्या नभांगणात तेजस्वी तारकांसारख्या उजळलेल्या महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई, महाराणी दुर्गाबाई, दिल्लीच्या दरबारात महाराणीचा अचाट अभिनय करून दिल्लीकर बादशहाला स्वतःला माँसाहेब म्हणून हाक मारायला भाग पडणाऱ्या मैनावती दासींसह क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यापर्यंत या भूमीतल्या सर्व थोर माताभगिनींना मानाचा मुजरा.
प्राणिमित्रांनी समाजास वेठीस धरण्याचा आगाऊपणा करू नये…
मनुष्यप्राणी आणि वन्यप्राणी यांच्या संबंधाचा नव्याने विचार करण्याची वेळ आली आहे. आज शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी देण्यासाठी इलेक्ट्रिसिटी बोर्ड मर्यादीत वेळ वीज देते. त्यामुळे वाळणारी पिके वाचविण्यासाठी शेतकरी रात्रीचे सापाच्या फणीवर पाय ठेऊन उसात उतरतात. आता तिथे बांधाबांधावर बिबटेभाऊ त्यांच्या स्वागतासाठी हजर आहेत. कोर्टामधून घाईघाईने हुकूम मिळवून प्राण्यांना आमच्यापासून दूर पळवणाऱ्या तथाकथित प्राणीमित्रांना आमच्या संस्कृतीचा आणि मानव व पशुंच्या पूर्वापार नात्यांचा इतिहासच ठाऊक नाही. हत्तीपालन आणि अश्वपालन सम्राट अशोका पासून शिवाजी राजांपर्यंत अनेक युगप्रवर्तक महापुरुषानी केले आहे. हत्तीघोड्यांचे पालन, संगोपन, आरोग्य व आहार या विषयावर पुरातन काळापासून शास्त्रोक्त विचार आणि संशोधन झालेले आहे. भारतीय सर्कशीची पाठराखण या भूमीमध्ये लोकमान्य टिळक, लाल बहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांनी केली आहे. सर्कशीची जन्मभूमी केरळच्या आधी मुंबई प्रांत आणि त्यातही आमच्या पूर्वीच्या सातारा जिल्ह्यातील ‘तासगाव’ ही आहे. एकट्या तासगावात एकेकाळी राष्ट्रीय दर्जाच्या १५ सर्कशी होत्या. या पार्श्वभूमीवर मी बिबटे आणि रानटी हत्तीसारखे प्राणी मोकाट सुटण्या ऐवजी सर्कशीमध्ये वापरायला पुन्हा परवानगी द्या अशी समाजाला व शासनाला विनंती करतो. प्राणिमित्रांनी समाजास वेठीस धरण्याचा आगाऊपणा करू नये.
पानशेतच्या प्रलयावर कादंबरी घडलेली नाही…
कादंबरी हा वाङ्मयप्रकार पूर्णतः परदेशी म्हणता येणार नाही. भेदीकीची रात्र रात्रभर चालणारी गाणी, सुबरानं मांडलं गा म्हणत धनगरांची रात्र रात्रभर ढोल आणि खैताळावर रंगणारी दीर्घ कथानके आणि त्यांचे पट कादंबरीसदृश्य आहेत. रामायण आणि महाभारताच्या कथा हा व्यास आणि वाल्मिकी सारख्या शब्दप्रभूंच्या लेखणीचा महाचमत्कार आहे. आपल्याकडे स्वातंत्र्याच्या आंदोलनावर किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या जनांदोंलनाची दाहकता दाखवणारी अगर ज्या पुण्यामध्ये बुद्धीचे बृहस्पती राहतात, त्या पुण्यातल्या पानशेतच्या प्रलयावर एखादी जबरदस्त कादंबरी घडलेली नाही.
बळीराजाची आत्महत्या हे सर्वांचेच अपयश..
या भूमितल्या शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेला हात घालणारा पहिला बंडवाला विद्रोही साहित्यिक म्हणजे महात्मा जोतिबा फुले. ज्यांनी ‘शेतकऱ्यांचा आसूड’ नावाची महागाथा १८८१ मध्ये लिहिली. शेतकरी नावाच्या दरिद्र्यनारायणाची कैफियत इंग्रज साहेबाला कळावी म्हणून ते सामान्य कुणब्याच्या पेहरावात ब्रिटिश साहेबाला भेटले असे मानतात. आज नोकरी नाही, म्हणून प्रत्येक खेड्यात शेकडो मुले बिनालग्नाची आहेत. बेकारीत पोळणाऱ्या मुलाशी लग्न करण्या ऐवजी डोक्यावर अक्षताच न पडलेल्या बऱ्या अशा विचाराने शेकडो मुलींचे विवाह लांबणीवर पडले आहेत. शेतीमालाला भाव नाही. ही भयानक शांतता आणि अस्वस्थता उद्याच्या भीषण भविष्याला आमंत्रण देणारी आहे हे बिलकुल विसरू नका. एका गोष्टीचे मला खूप दुःख वाटते, ते असे की, आमच्या पिढीतल्या साहित्यिकांनी जाणीवपूर्वक शेतकरी आत्महत्यांच्या दुष्ट पर्वामागच्या दु:खाची कारणमीमांसा आपल्या साहित्यातून सखोलपणे व्यक्त करायला हवी होती. बळीराजांच्या आत्महत्यांचे विषारी पर्व म्हणजे या भूमीतील सर्व राजकीय पक्षांचे, समाजाचे नव्हे तर आम्हा लेखक कलावंताचेसुद्धा अपयश आहे. गेल्या ४४ वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागचे कारण शोधणे आणि त्याचे निवारण करणे हे कोणालाही जमलेले नाही. अन खरे कारण म्हणजे काय, तर शेतकऱ्याला शेतीचा धंदा करणेच परवडत नाही. म्हणून तो म्हणे मरणाला मिठी मारतो. याच्या उलट गेल्या ४४ वर्षात म्हणजेच जवळपास गेल्या अर्ध शतकाच्या प्रवासात, कोणाही सरकारी अधिकाऱ्याच्या कुटुंबाने किंवा त्यांच्या नातेवाईकाने, अगर साध्या नगरपालिकेच्या लोकप्रतिनिधी पासून संसदेपर्यंतच्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीने अगर त्याच्या जवळच्या नातेवाईकाने सुरु केलेला कोणताही धंदा कधी बुडाला आहे असे कोणाला दाखून देता देईल का? मग बिचाऱ्या शेतकऱ्यांच्याच वाट्यास हे असे दु:खी जीवन का यावे?
शेतकऱ्याच्या पत्नीचा व मातेचा गौरव व्हावा…
आज एका शेतकरी मातेचा पुत्र साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाला, या गोष्टीची जाणीव ठेऊन मी शासनाकडे कळकळीची विनंती करतो आहे की, लाडक्या बहिणी प्रमाणेच मातीशी झट्या घेऊन धान्य पिकवणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पत्नीचा व मातेचा गौरव व्हायला पाहिजे. त्यासाठी ‘लढाऊ धरतीमाता’ नावाची नवी योजना हाती घ्यावी. एकीकडे त्या मतदान करण्यासाठी उपयोगी पडतीलच, पण त्याच वेळी जात शेतकऱ्याची असल्यामुळे त्या अन्नधान्य पिकवण्याचा आपला मूळ धर्मसुद्धा अजिबात विसरू शकणार नाहीत, याची मला खात्री आहे. कोणी म्हणेल कर्ज वाढते आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे, ‘भरलेल्या बैलगाडीला चिपाडाने किंवा पाचटाने काय ओझे?’ त्यामुळे या योजनेच्या खर्चाने फारसा फरक पडणार नाही.
ग्रंथालय चळवळीला अखेरीच घरघर..
सातारची ही भूमी महाराष्ट्राला आणि देशाला नव्या प्रागतिक विचाराच्या उंच शिखरावर घेऊन जाणाऱ्या यशवंतराव चव्हाणांची आहे असे आम्ही समजतो. डॉ. आंबेडकर आणि आचार्य अत्रे यांच्यानंतर यशवंतरावांच्या तोडीचा ग्रंथप्रेमी या भूमीमध्ये झाला नाही. चव्हाण साहेबांनी स्वतः लक्ष घालून इथे ग्रंथालयांच्या चळवळीला विलक्षण गती दिली होती. पण गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून आजपर्यंत ग्रंथ आणि ग्रंथालये या दोन्ही गोष्टीकडे आम्ही इतके अक्षम्य दुर्लक्ष करीत आहोत की, त्या चळवळीला अखेरची घरघर लागली आहे.
कुठे चालली आहे आमची अभिजात मराठी भाषा?..
१३ कोटींच्या या समृद्ध ऐतिहासिक महाराष्ट्रामध्ये मराठी ललित पुस्तकांच्या विक्रीची किती दुकाने आहेत? फक्त पस्तीस! यावेळी दारूची दुकाने राज्यभर किती आहेत हा प्रश्न आम्ही विचारत नाही. महाराष्ट्रात ३६ जिल्हे आहेत. त्यापैकी २० जिल्ह्यांच्या मुख्यालयामध्ये मराठी पुस्तक विक्रीचे दुकानच नाही. दोन कोटीच्या वर मुंबई महानगराची लोकसंख्या आहे. ज्यामध्ये मराठी पुस्तक विक्रीची दुकाने फक्त पाच आहेत. तिही जुन्या मुंबई शहरात. दादरच्या पुढे मुंबईत मराठी पुस्तक विक्रीचे एकही दुकान नाही. म्हणजे कुठे चालली आहे आमची अभिजात मराठी भाषा?
माफक दरात पुस्तक विक्रीच्या दुकानांना परवानगी द्यावी…
साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून मी ज्या जिल्ह्यांच्या मुख्यालयात ग्रंथविक्रीची दुकाने नाहीत. तिथे स्वत: जाऊन मराठी भाषक आणि ग्रंथप्रेमी मंडळीच्या सहकार्याने त्या त्या भागात अशी विक्री व्हावी म्हणून मी स्वत: प्रयत्न करणार आहे. पण मी मुख्यमंत्री महोदयांकडे फक्त दोन छोट्या मागण्या करणार आहे. या राज्यातील सर्व एस.टी बस स्थानकावरील आणि रेल्वेस्थानकावरील वृत्तपत्र आणि पुस्तक विक्री दुकानांची मुद्दाम डोंगरासारखी भाडी वाढवली गेली. मग मिठाईवाले आणि इतर विक्रेत्यांना चढा भाव घेऊन दुकाने देण्याची व्यवस्था झाली. तरी कृपया विशेष लक्ष घालून ही दुकाने माय मराठीसाठी पुन्हा सुरु करण्यात यावी. तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या व तहसीलदारांच्या कार्यालयासमोर अगदी माफक दरात पुस्तक विक्रीच्या दुकानांना परवानगी देण्यात यावी. जिथे खासगी प्रकाशकांबरोबर शासनाची प्रकाशने आणि साहित्य संस्कृती मंडळ व भाषा विभागाने प्रकाशित केलेले ग्रंथ अग्रहक्काने ठेवण्याची सोय होईल. वाचकांचाही फायदा आणि माय मराठीचीही चांगली सेवा घडेल. मी आज नव्हे तर चार वर्षांपूर्वी नाशिकच्या साहित्य संमेलनाचा उदघाटक म्हणून असा महत्वाचा मुद्दा मांडला होता की, ‘इथे ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना पुरेसे वेतन मिळायला हवे. जिथे एका बाजूला नगरपरिषदांमध्ये आणि महापालिकांमध्ये पाचशे किंवा हजार सफाई कामगारांना सुद्धा उत्तम असे वेतन आपण देतो. का तर ते संपूर्ण नगराची सफाई करतात. त्याच गावातील पाच किंवा दहा ग्रंथालयीन कर्मचारी जे तुमच्या मनाची मशागत करतात त्यांना आम्ही काय देतो?
माझी खात्री आहे की, एखाद्या मोठ्या नदीवरच्या एका मोठ्या पुलाचा खर्च म्हणजे साहित्य संस्कृतीच्या पन्नास ते साठ वर्षाच्या बजेटपेक्षा नक्कीच अधिक असतो. पण दुसरीकडे साहित्य संस्कृतीचा आमच्या जीवनातील जो अदृश्य पूल तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रवास करतो. त्यातुन मिळणारे ज्ञान, दृष्टी, दृष्टिकोन आणि भविष्यकालीन विचार हे तुम्हांला पैशामध्ये मोजता येणार नाहीत. म्हणूनच जेव्हा एखादा वरिष्ठ ग्रंथालयाची फाईल समोर येताच “पुस्तक वाचून कोण शहाणं झालं आहे का?” असे उर्मट उद्गार काढतो. तेव्हा तो कर्मचाऱ्यांचाच नव्हे तर माय मराठीला मोठेपण देणाऱ्या या भूमीतल्या साधुसंतांचा अपमान ठरतो.
कोणतेही राज्य चालवताना त्याचे अर्थकारण महत्वाचे असते. त्यामुळेच शिवरायांनी हिंदवी स्वराज्यासाठी मुसाफिरी व मोहीमा राबविल्या. हिंदवी स्वराज्याच्या वृद्धीसाठी पैसा उभारला. आजच्या भाषेत ‘निधी’ निर्माण केला. परंतु शिवरायांच्या स्वराज्याचा पाया हा निधी नव्हे तर ‘न्याय आणि नीतिवर’ आधारलेला होता. आणि जिथे न्याय वेळेत मिळत नाही, तिथे अवनीतीची कळा चढते हे सूत्र शिवरायांनी प्रमाण मानले होते.
आपले वर्तन मायमराठीच्या विकासाला मारक…
आज एकीकडे आम्ही अभिजात भाषा म्हणत स्वत:च्याच कौतुकाचे ढोल वाजवत फिरत आहोत. पण आम्हा सर्वांचेच वर्तन मायमराठीच्या विकासासाठी तारक नव्हे तर मारक असल्याचे, मी नव्हे तर आमचे नियम, अधिनियम आणि कागदपत्रे सांगतात. केंद्र आणि राज्य शासनाने लेखक आणि प्रकाशक यांच्यावर जो १८ टक्के जी.एस.टी लावला आहे. तो तात्काळ रद्द करावा. कारण मूळात प्रकाशन व्यवसायच आतबट्यातला आहे.
शासन नव्हे तर समाजाने सुद्धा ग्रंथ आणि संस्कृतिकडे मोठ्या मनाने पाहायला शिकले पाहिजे. अनेकदा आपल्या कुटुंबातले चार सदस्य मल्टीप्लेक्स मध्ये जातात. चारशे रुपयांचे प्रत्येकी एक प्रमाणे पॉपकॉर्न खुशीने खातात. आणि ते खाता-खाता मराठी पुस्तकांच्या किमती खूप भडकल्या असून ३०० रुपयाच्या खाली पुस्तक मिळत नाही असा गंभीर मुद्रेने विचार करतात. आज घराघरामध्ये आमच्या देव्हाऱ्याचा विस्तार वाढला आहे. पण अनावश्यक धोंड म्हणून घराघरातली व्यक्तिगत छोटी ग्रंथालये नष्ट झाली आहेत. मराठी भाषेमध्ये जी थोडीफार पुस्तके खपत असतील, त्यांना सुद्धा आज पायरसीच्या वाळविणे हैराण केले आहे.
सक्षमीकरण नक्की कुणाचे?…
२०१२ पासून राज्यातल्या मराठी शाळेच्या कोणत्याही नव्या तुकडीला शासकीय अनुदान मिळत नाही. म्हणजेच गेल्या १३ वर्षात एकही नवी मराठी शाळा सुरू झालेली नाही. २०२५ मध्ये एका आकडेवारी नुसार एका वर्षात ६५ नव्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मंजुरी मिळालेली आहे. एकट्या मुंबईत या कालावधीत १०६ मराठी शाळा बंद करण्याचा आम्ही पराक्रम घडवून आणला आहे. बाहेर गावी काय घडले असेल याची पुरी माहिती नाही. इंग्रजीसारख्या भाषेला कैवारी कमी आहेत म्हणून की काय, मुंबई आणि नागपूर सारख्या महापालिकांनी स्वत:च्या इंग्रजी शाळा सुरू करण्याचा आचरट उद्योग आरंभला आहे. ज्या मराठी शाळामध्ये २० पेक्षा संख्या कमी पटसंख्या असेल तर ती शाळा बंद करून तिथली शाळा जवळच्या दुसऱ्या शाळेत हलवायची आणि ह्या साऱ्या डामरट उद्योगाला ‘सक्षमीकरण’ असं गोंडस नाव द्यायचं. वास्तवात हे सक्षमीकरण आम्ही मराठी शाळांचं करतोय की, इंटरनॅशनल स्कूलवाल्यांचं हाच खरा प्रश्न आहे.
शासन आणि प्रशासन हेच माय मराठीचे खऱ्या अर्थी ‘घरचे मारेकरी’..
या आधी या देशातील तामिळ, संस्कृत, तेलगू, कन्नड, मल्याळी आणि उडिया या सहा भाषांना आमच्या आधी अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्यांनी आपापल्या भाषेचा देव्हाऱ्यांसारखं गौरव चालवला आहे. त्या त्या भाषेचे प्रेमी आणि अभिमानी इतके जागृत आहेत की, तिकडे त्यांच्या मातृभाषेतील शाळांच्या तुकड्या बंद करण्याचा आवाजसुद्धा काढायची कोणामध्ये धमक नाही. उलट आमच्याकडे गेल्या दहा वर्षातच नव्हे तर गेल्या ३५ वर्षापासून शासन आणि प्रशासन हेच माय मराठीचे खऱ्या अर्थी ‘घरचे मारेकरी’ ठरले आहेत. चिंध्या पांघरलेल्या स्थितीत आम्ही मराठी भाषेलाच नव्हे तर खुद्द तात्यासाहेब शिरवाडकरांना गलितगात्र स्थितीत मंत्रालयासमोर उभे केले आहे. मी जेव्हा सातवीच्या वर्गात होतो. तेव्हा पट पाच विद्यार्थ्यांचा होता. आजच्या सारखे हे पट संख्येचे जाचक नियम असते तर आमची शाळाच झाली नसती. वीस वैगेरे सोडा, वर्गात एखादा दुसरा विदयार्थी असला तरी मराठी शाळा चालायलाच हवी, कारण कोणी सांगावे मराठी शिकणारा तो एक विदयार्थी उद्याचा ज्ञानेश्वर होईल किंवा दुसरा तुकोबाही असेल.
मराठी शाळांचा आणि शिक्षणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी आपण एकच जादूची कांडी फिरवावी. सर्व नगरपालिका आणि महापालिका अगर ग्रामपंचायत क्षेत्रात असणाऱ्या मराठी शाळा, ती शाळा बंद पडली असली तरी, त्यांच्या इमारती किवा आजुबाजुच्या मोकळया जागेसह तदंगभूत वस्तुच्या विक्रीस अजिबात परवानगी दिली जाऊ नये. या एकाच जादुनेच अवघा चमत्कार घडेल.
माझा इंग्रजी किवा हिंदी भाषेला मुळीच विरोध नाही. आईच्या दुधावर वाढलेले बालक जसे बलवान असते. तसेच तिच्या मुखातल्या शब्दावर ते अधिक बलवान बनते. लक्षात ठेवा आईच्या शब्दसंस्कारात वाढलेले जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या शाळेत वाढलेले मूल तुमची जन्मभर श्रावण बाळासारखी काळजी घेईल. ते तुम्हाला कधीही वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवणार नाही. गेल्या ५० वर्षात महाराष्ट्रातील जे शास्त्रज्ञ आंतराष्ट्रीय स्तरावर गाजले. त्यापैकी ९८ टक्के शास्त्रज्ञ हे मराठीतूनच शिकले होते. गेल्या वर्षी मला फ्रँकफर्टच्या आंतराष्ट्रीय पुस्तक महोत्सवाला केंद्र सरकारने जर्मनीला पाठवले होते. तेव्हा काही शाळांना मी भेट दिली. जर्मनी सारख्या महाप्रगत राष्ट्रातसुद्धा प्राथमिक शिक्षण विद्यार्थ्यांना सक्तीने त्यांच्या मातृभाषेतच दिले जाते.
महात्मा फुल्यांनी हंटर साहेबांसमोर या देशातले शिक्षण आमच्याच भाषेत मिळावे असा आग्रह धरला होता. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बॅरीस्टर सावरकर असताना त्यांनी प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण मातृभाषेतूनच मिळायला हवे असा ठराव केला होता. महात्मा गांधीनींही मृत्यूच्या पाच दिवस आधी या देशातील लोकांची प्रगती ही फक्त मातृभाषेच्या माध्यमातून होऊ शकते असे सांगीतले होते. यापेक्षा कोणाची अधिक प्रमाणपत्रे हवीत?
मराठी धरतीची लेकरे गेली कुठे?..
शिवरायांनी मुंबईवर ताबा मिळवण्यासाठी मुंबई जवळची खांदेरी आणि उंदेरीच्या बेटावर हल्ले चढवले होते. आमच्या छत्रपती संभाजी राजांनी तर ‘केजविन’नावाच्या ब्रिटिश गव्हर्नर बरोबर १६८४ साली लेखीटाकी मुंबई खरेदी करायचा करारच केला होता. त्याची रक्कम ८० हजार पॅगोडा ठरवली गेली होती. या महानगरीचे मूळ रहिवासी कोळी, भंडारी, पाचकळशी, आगरी आणि कुणबी. मुंबईच्या गिरणगावातील आणि गिरगावातील आमची ती मूळ माणसे, या धरतीची लेकरे गेली कुठे? आणि हे अतिश्रीमंतांचे आक्रमण आमच्या छाताडावर आले कधी हे आम्हाला उमगलेच नाही. आता दादरमध्ये मराठी माणसांची संख्या अगदीच नावाला उरली आहे. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला मुंबई आणि मराठी भाषा ही किती त्यागातून आणि त्रासातून मिळाली आहे हे जाणून घ्या. इथल्या जनतेला मराठी भाषकांचे राज्य आणि मुंबई मिळू द्यायचे नाही, अशी कणखर भूमिका दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हे तर सरदार वल्लभाई पटेल यांनी घेतली होती, याचे अनेक घसघशीत पुरावे इतिहासात आहेत. मित्रांनो मराठी माणूस आणि मुंबईचं महत्व आमच्या अण्णा भाऊंनीच एक वाक्यात सांगून टाकलंय, ‘अरं वाघाला नखं आणि गरुडाला पखं तशी मुंबई मराठी माणसांची.’
कोणत्या देवाकडे नवस बोलायचा?..
९९ व्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून या नात्याने मी भीती नव्हे तर वस्तुस्थिती सांगतो आहे. संयुक्त महाराष्ट्रात आम्ही मुंबई मिळवली, तेव्हा मराठी माणसांची संख्या ५०-५२ टक्के होती. २००१ च्या जनगणनेनुसार ती आता ३० टक्क्यांवर आली. नंतर २०११ च्या आकड्या नुसार साधारण ती संख्या ३५ टक्के झाली. आता तर ती त्याहून खूप खाली निचांकावर जाऊन पोचली आहे. गिरगाव, दादर, पार्ला सारे रिकामे होत आहे. आम्हां सर्वांच्या डोक्यावरुन पुनर्वसन आणि स्थलांतराचा वरवंटा फिरतो आहे. पण मलबार हिल इंद्रपुरी नावाच्या जागेच्या पुर्नवसनाचा प्रस्ताव कधी परमेश्वराला सुद्धा स्वप्नात बघायला मिळणार नाही. जेव्हा या भूमीतले हत्ती आणि नवसाचे गणपतीसुद्धा आमचे राहिले नाहीत. त्यांना पुन्हा मिळवण्यासाठी आम्ही आता कोणत्या देवाकडे नवस बोलायचा.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पाळणा हलवताना त्यांच्या मातोश्री भिमाबाईच्या मुखातून, तसेच महात्मा फुले यांच्या पाळण्याची दोरी ओढताना त्यांच्या माता चिमणाबाईच्या ओठातून आणि बाळ शिवरायांना जोजवतना जिजाऊ साहेबांच्या कंठातून बाहेर पडलेल्या महन्मंगल ओव्या फक्त मराठी भाषेतच होत्या, या गोष्टीचा अजिबात विसर पडू देवू नका. लवकरात लवकर जागे व्हा. अन्यथा असेच गुंगीत राहाल तर कायमचे संपून जाल. भाषा मराठी हीच असावी आमच्या ललाटी! म्हणून बाप होss साताऱ्याची ही पवित्र भूमी सोडताना एक पवित्र शपथ घेऊया. आमची माय मराठी वाचवूया. फक्त ज्ञानोबा आणि तुकोबाच्या पालख्या नाचवूया!

