पुणे -भारतीय जनता पक्षाने मतदाना आधीच खाते उघडले आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग ३५ (ब) मधील उमेदवार मंजूषा नागपूरे आणि ३५ (ड) मधील उमेदवार श्रीकांत जगताप हे बिनविरोध निवडून आलेले आहेत.
नागपूरे यांच्यासह या प्रभागात सहा उमेदवारांचे अर्ज होते. त्यातील दोन अर्ज छाननीत बाद झाले होते. त्यानंतर चार अर्ज शिल्लक होते. त्यातील तीन उमेदवारांनी शुक्रवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी माघार घेतली. त्यामुळे नागपूरे यांची बिनविरोध निवड झाली असून त्या सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या आहेत. या प्रभागात मागील दहा वर्षांपासून त्या सातत्याने कार्यरत असून नागपूरे यांचे पती दिपक नागपूरे हे भाजपचे सरचिटणीस आहे. या प्रभागात शहरात सर्वाधिक कमी अर्ज आले होते. तर, उर्वरीत उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्यात भाजपला यश आले असल्याने नागपूरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
प्रभाग ३५ (ड )सर्वसाधारण या गटातून श्रीकांत शशिकांत जगताप हे बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यांच्या विरोधातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नितीन गायकवाड यांनी अर्ज माघारी घेतला आहे. त्यामुळे जगताप यांच्या निवडीचा मार्ग सुकर झाला आहे. श्रीकांत जगताप हे दुसऱ्यांदा भाजपच्या माध्यमातून नगरसेवक झालेले आहे. श्रीकांत जगताप यांनी मतदारसंघात इतर उमेदवारांसोबत प्रचार मोहीम सुरू केलेली होती. विविध नागरिकांची भेटीगाठी घेतली त्यांनी प्रचारांमध्ये आघाडी देखील घेतली. मात्र, अर्ज छाननी आणि अर्ज माघारीच्या वेळी प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने त्यांचा विजयाचा मार्ग सुकर बनला.

