मुंबई- “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केले होते. मात्र, दिलेल्या मुदतीपर्यंत राज्यातील २ कोटी ४७ लाख महिलांपैकी १ कोटी ८० लाख महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याचे महिला व बाल विकास विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्याने ६७ लाख महिला लाभापासून मुकणार आहेत. दरम्यान, नवीन वर्षापासून जानेवारीपासून त्यांच्या बँक खात्यात नोव्हेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून २०२४ मध्ये या योजनेची घोषणा केली होती. सुरुवातीला तब्बल २ कोटी ६२ लाख अर्ज दाखल झाले होते. मात्र, छाननीमध्ये अनेक त्रुटी समोर आल्या.
महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यात एकूण २ कोटी ४७ लाख महिला पात्र होत्या. त्यापैकी केवळ १ कोटी ८० लाख महिलांनीच विहित मुदतीत ई-केवायसी केली आहे. उर्वरित ६७ लाख महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण न केल्याने त्या आता या लाभापासून मुकणार आहेत. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवरील भार काही प्रमाणात कमी होईल.
निवडणूक आणि तांत्रिक कारणांमुळे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांचे हप्ते प्रलंबित होते. त्यापैकी नोव्हेंबरचा हप्ता १ जानेवारीपासून बहुतांश महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे, त्यांच्या खात्यात आता १५०० रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ५ लाखांहून अधिक महिलांचे आधार कार्ड बँकेशी लिंक नाही.

