अवघी सातारानगरी साहित्यमय, ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची भव्य ग्रंथदिंडी
लीळाचरित्र ते संविधान या ग्रंथांच्या पालखीतून साताऱ्याने जपला मराठी मनाचा मानबिंदू
सातारा : ‘मी भाषाभिमानी… मी साहित्यप्रेमी’ असे निनादणारे जयघोष… ढोल ताशांचा गगनभेदी गजर… बालगोपाळांचा उत्स्फूर्त सहभाग… विविध संकल्पनांनी सजलेले आकर्षक रथ… शोभायात्रेच्या स्वागतासाठी मार्गावरील रांगोळ्यांच्या सुंदर पायघड्या… अशा जल्लोषपूर्ण आणि उत्साही वातावरणामध्ये आज ऐतिहासिक सातारा नगरीमध्ये ग्रंथदिंडी काढण्यात आली. ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला विविध मौलिक ग्रंथांच्या दिंडीमुळे अवघे शहर साहित्यमय होऊन गेले. पारंपरिक वेशभूषेत, अलोट गर्दीमध्ये साहित्यप्रेमी यात सहभागी झाले. उदंड उत्साहात न्हाऊन निघाले. या अनोख्या शब्द-वारीचा आनंद सर्वांनी मनसोक्त घेतला.
ग्रंथदिंडी व शोभायात्रेत भारतीय संत परंपरेपासून समाज सुधारकांचे कार्य, भारतीय संस्कृती, लोकसाहित्य तसेच साताऱ्यातील शिक्षण, पर्यटन आणि साहित्य परंपरांचे वैविध्यपूर्ण असे चित्रण दिसून आले. ऐतिहासिक सातारा नगरीतील राजवाडा या ऐतिहासिक स्थानापासून संमेलनस्थळ असणाऱ्या शाहू मैदानपर्यंत ही ग्रंथदिंडी मोठ्या उत्साहात निघाली. आकर्षक फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये लीळाचरित्र, श्री तुकाराम गाथा, सार्थ श्री ज्ञानेश्वरी, भारताचे संविधान, संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील लिखित ‘महासम्राट’ आणि मावळत्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर लिखित ‘सीतायन’ हे ग्रंथ ठेवण्यात आले होते. त्यांचे पूजन करून पालखीने प्रस्थान केले. या वेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, स्वागताध्यक्ष छ. शिवेंद्रराजे भोसले, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, कार्यवाह सुनिताराजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी काढलेल्या महारथामध्ये विश्वास पाटील, मिलिंद जोशी, छ. शिवेंद्रराजे भोसले विराजमान झाले. संमेलनस्थळी पालखी आल्यानंतर साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, अमेरिकास्थित लेखक व तेथील खासदार श्रीनिवास ठाणेदार, संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. वंदना मुरकुटे आदींनी पालखीचे स्वागत केले.
तब्बल ३३ वर्षांनंतर शतकपूर्व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा शाहूपुरी (सातारा) आणि मावळा फौंडेशनला मिळाला आहे.
ग्रंथ पालखी संमेलन स्थळाच्या दिशेने निघण्यापूर्वी ग्रंथ दिंडीची सुरुवात मराठमोळ्या शाही पद्धतीने करण्यात आली. यावेळी तुतारीच्या निनादात अब्दागिरी, छत्र्या, झांज पथक अशा सर्वांच्या सहभागाने अस्सल मराठी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. यावेळी वेद भवन शाही दरबार ऑल इव्हेंट साताराचे १० तुतारी, १० अब्दागिरी, १० छत्र्या, ५० झांज पथक, १० घोडे, ६ वासुदेव सहभागी झाले होते, अशी माहिती सातारा जिल्हा तुतारी वादक जिल्हाध्यक्ष सुहास क्षीरसागर यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील एकूण ५५ शाळा व महाविद्यालयांचे चित्ररथ समाविष्ट झालेले होते. प्रत्येक रथामध्ये वैविध्यपूर्ण संकल्पना साकारलेल्या होत्या. चित्ररथांच्या माध्यमातून मराठी संत साहित्यातील सुविचार तसेच मराठी सारस्वतांनी मराठी भाषेच्या योगदानासाठी केलेल्या साहित्य निर्मितीचे दर्शन सर्व साहित्यप्रेमींना घडत होते. मराठी मातीचा अस्सलपणा जोपासताना या ग्रंथदिंडी व शोभायात्रेत पालखी, अबदारी, ढोल-ताशे, लेझीमचे खेळ, वारीचे छोटेखानी दर्शन, बग्गी, घोडेस्वार यांच्यासह सनई-चौघड्यांचे पारंपरिक स्वर मिसळले होते. लेझिम, बँड पथकासह एन. सी. सी. पथकाचाही यात सहभाग होता. या वेळी महाराष्ट्रातील लोककलांचे दर्शनही घडत होते. या ग्रंथदिंडीत रयत शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, सातारा एज्युकेशन सोसायटी तसेच श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल सातारा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले ती शाळा, यशोदा शिक्षण संस्था यांच्यासह विविध मान्यवर शिक्षण संस्थेतील हजारो विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते.
साहित्य प्रेरणा ज्योत..
सातारा जिल्ह्याला साहित्यिकांची समृद्ध परंपरा लाभली आहे आणि मराठी साहित्य क्षेत्रात या साहित्यिकांचे मोलाचे योगदान आहे. अशा साहित्यिकांच्या स्मृती जागविण्यासाठी आणि नव्या पिढीला त्यांच्या कार्याची महती कळण्यासाठी सातारा जिल्ह्यातील दिवंगत साहित्यिकांच्या निवासस्थानापासून ते संमेलन स्थळापर्यंत ‘साहित्य प्रेरणा ज्योत’ काढण्यात आली. वेद अकॅडमीची मुले यात उत्साहाने सहभागी झाली होती.

