शिवसेना निवडणूक मुख्य कचेरीचे उदघाटन:नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे-
पुणे शहराच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर–पद्मावतीमधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार माजी उपमहापौर आबा बागुल आणि पॅनलच्या तीनही उमेदवारांना प्रचारात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रभागासह शहराचा विकास गतिमान करणार असून विकासात निश्चितच पुणे अव्वल ठरणार असल्याचा ठाम विश्वास प्रचाराच्या शुभारंभावेळी आबा बागुल यांनी व्यक्त केला.
शिवसेनेचे उमेदवार आबा बागुल यांच्यासह बाळासाहेब उर्फ मच्छिन्द्र ढवळे, पूनम हरीश परदेशी, नयना नितीन लगस यांच्या सारंग येथील शिवसेना निवडणूक मुख्य कचेरीचे उदघाटन पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री आबा बागुल यांच्या हस्ते झाले. त्यानंतर शिवदर्शन, तावरे कॉलनी, संजय नगर वसाहत, गवळीवाडा, अण्णाभाऊ साठे वसाहत यासह प्रभागात विविध ठिकाणी पदयात्रा काढून आबा बागुल यांच्यासह बाळासाहेब उर्फ मच्छिन्द्र ढवळे, पूनम हरीश परदेशी, नयना नितीन लगस यांनी नागरिकांशी संवाद साधला. ठिकठिकाणी आबा बागुल यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. यावेळी ‘आमचे मत विकासाला, हक्कांच्या माणसांनाच ‘ अशी ग्वाही नागरिकांनी दिली तर आबा बागुल यांनी तुम्ही पाहिलंय,तुम्ही अनुभवलं,माझा ध्यास विकासाचाच सदैव आहे. कारण हे नातं विश्वासाचं आहे.तुमच्याप्रती आत्मीयतेचं आहे.घोषणांपेक्षा कृतीवर भर,शब्दांपेक्षा कामातून निर्माण झालेला हा विश्वास आहे.त्यासाठी यंदा लक्षात ठेवा, धनुष्यबाण असे आवाहन केले. नागरिकांनीही भरभरून प्रतिसाद देत विकासासाठी यंदा शिवसेनाच असा निर्धार व्यक्त केला.

