पुणे,दि०१:- पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळ विभागामार्फत महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व मतदार जनजागृतीसाठी IEC साहित्य वाटप तसेच मतदानाची दृकश्राव्य स्वरूपातील माहिती देणा-या वाहनाचे उद्घाटन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचे हस्ते शिवाजीनगर-घोलेरोड आर्ट गॅलरी याठिकाणी करण्यात आले.
उपायुक्त अविनाश सपकाळ यांनी सांगितले कि,’ घनकचरा व्यवस्थापन विभागाचे पुणे शहर हे ऐतिहासिक, शैक्षणिक व सांस्कृतिक वारसा लाभलेले एक सुंदर शहर आहे. त्याची स्वच्छता व पर्यावरणीय शाश्वतता जपणे ही पुणे महानगरपालिकेची प्रमुख जबाबदारी असून स्वच्छ, सुरक्षित व हरित पुणे घडविण्यासाठी प्रशासन आणि नागरिक यांचा संयुक्त सहभाग अत्यावश्यक आहे.याच अनुषंगाने स्वच्छ भारत अभियानाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पुणे महानगरपालिकेमार्फत वर्तनबदल संवाद (IEC-BCC) च्या अंतर्गत स्वच्छ पुणे संकल्प २०२६ चे आयोजन करण्यात आले.
स्वच्छ पुणे ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून प्रत्येक पुणेकराची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिक, स्वयंसेवी संस्था, विविध भागधारक व महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे पुणे शहर स्वच्छता आणि शाश्वत विकासाच्या दिशेने सातत्याने पुढे जात आहे. भविष्यातही हे प्रयत्न अधिक बळकट करून पुणे शहर एक आदर्श आणि जबाबदार शहर म्हणून विकसित करणेच्या अनुषंगाने आज दिनांक ०१/०१/२०२६ रोजी “स्वच्छ पुणे संकल्प २०२६० चे उद्घाटन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) श्रीमती पवनीत कौर, शिक्षण विभाग उपायुक्त श्रीमती वसुंधरा बारवे, घनकचरा व्यवस्थापन चे उपायुक्त अविनाश सकपाळ, उपायुक्त संतोष वारुळे, उपायुक्त प्रसाद काटकर, उपायुक्त माधव जगताप, अरविंद माळी, मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे, सहाय्यक आयुक्त श्रीमती प्रज्ञा पोतदार, डॉ. साधना भांगरे, प्र. सहाय्यक आरोग्य अधिकारी, डॉ. केतकी घाटगे,प्र. सहाय्यक आरोग्य अधिकारी, बाळासाहेब ढवळे पाटील, अपेक्स कमिटीचे सदस्य तसेच क्षेत्रिय कार्यालयाकडील सहाय्यक आयुक्त, उप प्रमुख आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, मोकादम, घनकचरा व्यवस्थापन मुख्य विभागाकडील टीम, E & Y टीम, स्वच्छ संस्थेकडील समन्वयक, HMS टीम, वेल्फेअर प्रोडक्शन टीम इ. उपस्थित होते.
यावेळी पुणे महानगरपालिका, घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत संपूर्ण वर्षभरात IEC च्या अनुषंगाने करावयाच्या विविध उपक्रमांबाबतच्या नियोजनाविषयीचे पुस्तक स्वच्छ पुणे संकल्प २०२६ माझे शहर, माझी जबाबदारी…” या पुस्तकाचे अनावरण महापालिका आयुक्त यांचे हस्ते करण्यात आले. तसेच सार्वजनिक स्वच्छता विषयक कामकाज करणा-या सफाई सेवकांना प्रातिनिधिक स्वरूपात PPE किट प्रदान करण्यात आले. तसेच आदी स्कूल ऑफ डान्स अकॅडमी यांचे विद्यार्थीनींनी सुंदर नृत्याविष्कार सादर केले.
तसेच दैनंदिन कामकाज कार्यक्षमतेने केल्यास्तव मुख्य आरोग्य निरीक्षक, घनकचरा व्यवस्थापन,आय.एस. इनामदार,वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, कोथरुड-बावधन क्षेत्रिय कार्यालय, गणेश खिरीड, आरोग्य निरीक्षक, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय श्रीमती प्रियांजली पवार, मोकादम अविनाश पोकळे,सफाई सेविका श्रीमती अंजना गायकवाड यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
स्वच्छ पुणे संकल्प २०२६ या उपक्रमाच्या माध्यमातून पुणे महानगरपालिका स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत नागरी विकासासाठी एक व्यापक व नियोजनबद्ध पुढाकार घेत असून या उपक्रमाचा उद्देश प्रशासन, नागरिक यांच्या संयुक्त सहभागातून स्वच्छतेविषयीची सामूहिक जबाबदारी अधिक दृढ करणे हा आहे असे मत यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांनी व्यक्त केले व उपस्थीतींना मार्गदर्शन केले.
महिला, युवक, विद्यार्थी, व्यापारी, फेरीवाले तसेच विविध सामाजिक संस्थांचा सहभाग या उपक्रमाला व्यापक स्वरूप देईल आणि स्वच्छ पुणे घडविण्याच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळेल. स्वच्छ पुणे संकल्प २०२६ हा केवळ एक उपक्रम नसून स्वच्छ, सुंदर व शाश्वत पुण्यासाठी प्रशासन व नागरिक यांचा एकत्रित संकल्प आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पुणे शहर स्वच्छतेच्या दिशेने एक आदर्श व जबाबदार शहर म्हणून पुढे जाईल, असा मला दृढ विश्वास आहे असे यावेळी महापालिका आयुक्त यांनी नमूद केले.

