– ‘पुण्यातील नावे आणि त्यांच्या गोष्टी’ या विषयावर व्याख्यान –
सुलभ शिक्षण मंडळ व श्री गोपाळ हायस्कूल यांच्या वतीने बहुश्रुत व्याख्यानमालेचे आयोजन
पुणे : पुण्याचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा असून तो अतिशय समृद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. पुणे परिसरात अश्मयुगीन काळातील हत्यारे सापडलेली असून, मुठा नदीच्या प्रवाहात उत्खननादरम्यान ही हत्यारे आढळून आली आहेत. यावरून पुण्याला हजारो वर्षांचा इतिहास असल्याचे लक्षात येते. मुठा नदीचे पाणी ज्ञान व शौर्य प्रदान करणारे मानले जाते. पुण्याची काळरेषा अत्यंत प्राचीन व समृद्ध असली तरी, आधुनिक विकासकामांमुळे अनेक जुन्या खुणा आणि ऐतिहासिक ठसे हळूहळू नामशेष होत चालल्याची खंत अभ्यासक आशुतोष बापट यांनी व्यक्त केली.
सुलभ शिक्षण मंडळ, पुणे आणि श्री गोपाळ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित बहुश्रुत व्याख्यानमालेत ते ‘पुण्यातील नावे आणि त्यांच्या गोष्टी’ या विषयावर बोलत होते. सदाशिव पेठेतील श्री गोपाळ हायस्कूल येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी संस्थेच्या कार्याध्यक्ष डॉ. उमा बोडस उपस्थित होत्या.
आशुतोष बापट पुढे म्हणाले, नागझरी, आंबील ओढा यांसारखे जलस्रोत प्राचीन काळात अस्तित्वात होते. आजच्या संपूर्ण बाजीराव रस्त्यावरून पूर्वी आंबील ओढा वाहत होता. शनिपाराजवळ या ओढ्याच्या प्रवाहामुळे अनेक लोक बुडून मृत्युमुखी पडल्याच्या नोंदी आढळतात. नानासाहेब पेशव्यांनी आंबील ओढ्याचा प्रवाह वळवला, अशी रंजक ऐतिहासिक माहिती त्यांनी यावेळी दिली.
ते पुढे म्हणाले, गावाच्या संरक्षणासाठी गावाच्या सीमेवर मारुतीची स्थापना करण्याची प्रथा होती. जिथपर्यंत वस्ती होती, तिथे मारुती असायचा. जसजशी वस्ती वाढत गेली, तसतशी पुढे नवीन मारुतींची स्थापना होत गेली. त्यामुळे पुण्यातील मारुतींच्या स्थानावरून शहराचा विस्तार कसा झाला, याचा अभ्यास करता येतो. पुण्यातील मारुतींना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि रंजक नावे आहेत.
प्रेतयात्रेदरम्यान जिथे थांबा घेतला जात असे, तेथे विसावा मारुती, प्रेत नेताना नातेवाईक जिथे रडत असत, तो रड्या मारुती, उंटांच्या काफिल्याचा विसावा जिथे होत असे, तो उंटाड्या मारुती, तर पेशव्यांनी पुणे सोडावे का, असा विचार करताना जो मारुती हलल्यासारखा भासला, तो डुल्या मारुती म्हणून ओळखला जातो. जकात चुकवणारे पळून जाऊ नयेत म्हणून घोड्यावर स्वार असलेले घोडेस्वार ज्या ठिकाणी असत, त्या ठिकाणाला स्वारगेट असे नाव पडले, अशी माहितीही त्यांनी दिली.

