पुणे, दि ३१: महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचार, बैठका आणि राजकीय गणिते सुरू असताना प्रभाग क्रमांक 24 ड चे उमेदवार तथा माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी जिव्हाळ्याच्या नात्यांना प्राधान्य देत आज पुणे शहराच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या दिवंगत नेत्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत संवाद साधला.
दिवंगत माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या निवासस्थानी जाऊन बिडकर यांनी राजपाल कुटुंबीयांची सदिच्छा भेट घेतली. मोहनसिंग राजपाल हे महापौर असताना गणेश बिडकर यांना स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. या आपुलकीच्या भेटीवेळी त्या काळातील आठवणींना उजाळा मिळाला.
यावेळी कुटुंबियांशी संवाद साधताना गणेश बिडकर म्हणाले, “स्वर्गीय मोहनसिंग राजपाल यांचा प्रदीर्घ अनुभव, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि सर्वसमावेशक, संयमी स्वभाव जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. पुण्याचे पहिले शीख महापौर म्हणून मोहनसिंग राजपालजी यांनी घेतलेले अनेक दूरदृष्टीपूर्ण आणि धाडसी निर्णय आजही शहराच्या विकासासाठी दिशादर्शक ठरत आहेत”.
दरम्यान, काँग्रेसचे माजी नगरसेवक स्व. सीतारामभाऊ थोपटे तसेच माजी नगरसेविका स्व. शोभाताई बारणे यांच्या निवासस्थानी देखील आज गणेश बिडकर यांनी सदिच्छा भेट देत कुटुंबीयांची संवाद साधला.
निवडणूक म्हणजे केवळ सत्ता आणि आकडेमोड नव्हे, तर शहराच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या नेत्यांचा सन्मान आणि त्यांच्या कुटुंबीयांशी आपुलकी जपणेही तितकेच महत्त्वाचे असते, हे या भेटीतून अधोरेखित झाले. राजकारणापलीकडची नाती जपणाऱ्या गणेश बिडकर यांच्या या कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

