पुणे -आंतरराष्ट्रीय विमानतळाने २०२५ मध्ये प्रवासी संख्येचा नवा उच्चांक गाठला असून वर्षभरात एक कोटी आठ लाखांहून अधिक प्रवाशांनी येथेून प्रवास केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या सुमारे ६.१ टक्क्यांनी वाढली आहे. देशातील वेगाने वाढणाऱ्या विमानतळांमध्ये पुणे विमानतळाचा समावेश झाला असून वाढती हवाई वाहतूक, नव्या सुविधा आणि नवीन विमानसेवांमुळे ही प्रगती शक्य झाली आहे.
नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सध्या पुणे विमानतळावरून दररोज २०० पेक्षा अधिक विमानफेऱ्या होत असून पुणे–दोहा ही नवीन आंतरराष्ट्रीय विमानसेवाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या वाढली आहे.
उड्डाणांच्या संख्येतही वाढ झाली असून २०२५ मध्ये सुमारे ७०,९९२ उड्डाणांची नोंद झाली आहे. प्रवाशांचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी डिजी यात्रा, ई-गेट्स, इनलाइन बॅगेज स्क्रीनिंग सिस्टीम, प्रवाह व्यवस्थापन प्रणाली आणि १०६ फ्लाइट माहिती स्क्रीन बसवण्यात आल्या आहेत. यामुळे प्रतीक्षा वेळ कमी होऊन प्रवाशांचे समाधान वाढले आहे.
२०२६ मध्ये जुन्या टर्मिनलचे नूतनीकरण, पुरंदर येथे नवीन विमानतळाच्या बांधकामाची सुरुवात आणि पीएमपीएमएल बस ताफ्यात वाढ अशा महत्त्वाच्या घडामोडींमुळे पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला आणखी चालना मिळणार आहे.

