पुणे-राजकीय पक्षांनी गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित व्यक्तींच्या पत्नींना आणि चक्क तुरुंगात असलेल्या आरोपींना उमेदवारी दिल्याने खळबळ उडाली आहे. या प्रवृत्तीचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र निषेध केला असून, “राजकीय पक्षांची डोकी ठिकाणावर आहेत का? गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी संबंधित व्यक्ती जनतेच्या हिताची कामे करतील का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
पुण्यातील कुख्यात गुंडांच्या टोळीतील तीन सदस्यांनी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे एबी फॉर्म भरून उमेदवारी दाखल केली आहे. केवळ राष्ट्रवादीच नाही, भाजपकडूनही अपहरण, खंडणी आणि गोळीबाराचे आरोप असलेल्या गुंडाच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. हे प्रकरण महापालिका निवडणुकीत चांगलेच तापण्याची शक्यता असून, अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. .
अंजली दमानिया यांनी विशेषतः अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. पुण्याच्या राजकारणात दहशत असलेल्या आंदेकर कुटुंबातील दोन महिलांना पक्षाने तिकीट दिले आहे, ज्या सध्या तुरुंगात आहेत. यावर “नगरसेवकाचे काम कचरा व्यवस्थापन, गटारांची सफाई, पाणीपुरवठा आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधा देणे हे असते. ज्या महिला स्वतः तुरुंगात आहेत, त्या जेलमधून या सोयी नागरिकांना कशा काय पुरवणार आहेत?” असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय.
नगरसेवक हा जनतेचा प्रतिनिधी असतो. कचरा व्यवस्थापन, गटारांची साफसफाई, प्राथमिक शिक्षण, दवाखाने, खेळाची मैदाने अशा मूलभूत सुविधा नागरिकांना देणे हेच नगरसेवकाचे काम आहे. मात्र सध्याच्या निवडणुकीत अजित पवार गटाने आंदेकर कुटुंबातील, सध्या तुरुंगात असलेल्या दोन महिलांना तिकीट दिले आहे. तुरुंगातून त्या मूलभूत सुविधा, ह्या बायका कशा देणार आहेत? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला.
ह्या दोघींव्यतिरिक्त अजित पवार गटाने गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध आणि खुनाच्या आरोपाखाली असलेल्या बापू नायर यांच्या पत्नीला, गजा मारणे यांच्या पत्नीला तिकीट दिले आहे. तर दुसरीकडे, भाजपने अपहरण, खंडणी आणि गोळीबाराच्या आरोप असलेल्या देविदास चोर्घे यांच्या पत्नीला तिकीट दिले आहे. काय अपेक्षा ठेवणार जनता ह्यांच्याकडून ? अशा लोकांकडून कचरा उचलला जाईल का? गटारे साफ होतील का? नागरिकांची कामे होतील का? राजकीय पक्षांची डोकी ठिकाणावर आहेत का? असा संतप्त सवाल अंजली दमानिया यांनी केला.

