पुणे-पुण्यात घडलेली एक घटना या सगळ्यांपेक्षा वेगळी आणि धक्कादायक ठरली आहे. एकाच पक्षाच्या दोन उमेदवारांमधील चढाओढ इतकी टोकाला गेली की थेट निवडणुकीचा अधिकृत एबी फॉर्म गिळण्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण निवडणूक यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांसमोर हजर होताना त्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत आपली बाजू स्पष्ट केली असून, एबी फॉर्म फाडल्याची कबुली दिली आहे. मात्र, फॉर्म खाल्ल्याचा आरोप त्यांनी ठामपणे फेटाळून लावला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना कांबळेंनी संपूर्ण घटनेमागची इनसाईड स्टोरी सांगितली. उद्धव कांबळे म्हणाले की, माध्यमांमध्ये मी एबी फॉर्म गिळल्याच्या ज्या बातम्या आल्या, त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. मी फॉर्म खाल्लेला नाही. माझा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मला समजलं की अर्जांची छाननी सुरू आहे. त्याच वेळी मच्छिंद्र ढवळे यांनी आमच्या पक्षाकडून अर्ज दाखल केल्याची माहिती मिळाली. मी त्यांना वैयक्तिकरित्या ओळखत नाही आणि त्यांचा पक्षाशी काहीही संबंध नाही, असा दावा त्यांनी केला.
कांबळे म्हणाले की, वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधल्यानंतर आपणच अधिकृत उमेदवार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आणि त्याबाबतचं पत्र निवडणूक आयोगालाही देण्यात आलं. सगळा प्रकार समजल्यानंतर मी कार्यालयात पोहोचलो. त्या वेळी भावनेच्या भरात तो फॉर्म माझ्याकडून फाटला गेला. ही माझी चूक आहे आणि मी ती शंभर टक्के मान्य करतो, असंही त्यांनी सांगितलं. प्रभाग क्रमांक 36 मध्ये आपण अनेक वर्षांपासून काम करत असून एकनिष्ठ कार्यकर्ता असल्याचं सांगत, ढवळे यांना आपण किंवा शिवसेनेचे कोणतेही पदाधिकारी ओळखत नसल्याचंही उद्धव कांबळे यांनी स्पष्ट केलं.
पुण्यातील पद्मावती भागातील प्रभाग क्रमांक 36 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या उमेदवारीवरून हा वाद निर्माण झाला. या प्रभागात ड गटातून मच्छिंद्र ढवळे यांना पक्षाकडून अधिकृत एबी फॉर्म देण्यात आला होता. त्यांनी मंगळवारी पक्षाचा एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्याच दिवशी त्याच प्रभागासाठी उद्धव कांबळे यांनाही पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला आणि त्यांनीदेखील उमेदवारी अर्ज सादर केला. एकाच जागेसाठी एकाच पक्षाकडून दोन उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
उमेदवारी अर्जांची छाननी सुरू असताना या वादाने गंभीर वळण घेतले. मच्छिंद्र ढवळे यांचा अर्ज आधी दाखल झाल्यामुळे तो वैध ठरण्याची शक्यता अधिक असल्याचे उद्धव कांबळे यांच्या लक्षात आले. याच पार्श्वभूमीवर बुधवारी छाननीदरम्यान उद्धव कांबळे कात्रज येथील क्षेत्रीय निवडणूक कार्यालयात पोहोचले. नियमानुसार, उमेदवाराला आपल्या प्रभागातील अर्ज पाहण्याचा अधिकार असल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांनी सर्व अर्जांचा गठ्ठा त्यांच्यासमोर ठेवला. याच संधीचा गैरफायदा घेत उद्धव कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळे यांच्या अर्जासोबत जोडलेला पक्षाचा एबी फॉर्म अचानक फाडला.
एबी फॉर्म फाडल्यानंतर कांबळे थेट बाथरुमच्या दिशेने धावले. निवडणूक कर्मचारी त्यांच्या मागे पळाले, मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली. प्रत्यक्षदर्शींनुसार, उद्धव कांबळे यांनी तो फाडलेला एबी फॉर्म क्षणार्धात तोंडात कोंबला आणि गिळून टाकला, असा दावा करण्यात येत आहे. सरकारी दस्तऐवज नष्ट केल्याचा हा प्रकार घडताच निवडणूक कार्यालयात एकच गोंधळ उडाला. छाननी प्रक्रियेदरम्यान असा प्रकार घडल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी तातडीने याची दखल घेतली आणि पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.
या घटनेनंतर निवडणूक यंत्रणेकडून कडक पावले उचलण्यात आली. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच वेल्हा येथील नायब तहसीलदार मनीषा भुतकर यांनी सरकारी कामात अडथळा आणणे आणि सरकारी कागदपत्र नष्ट केल्याप्रकरणी पोलिसांत लेखी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी उद्धव कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. कायदा व सुव्यवस्था भंग केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर 70 पोलिस कर्मचारी कांबळे यांचा शोध घेत होते, अशी माहिती समोर आली.
दरम्यान, या प्रकरणात नाट्यमय वळण आले. पोलिस शोध घेत असतानाच उद्धव कांबळे स्वतःहून पोलिस स्टेशनमध्ये हजर झाले. पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांसोबत आपण स्वेच्छेने पोलिसांसमोर आलो असल्याचे त्यांनी सांगितले. आपणच प्रभाग क्रमांक 36 मधून पक्षाचे अधिकृत उमेदवार असून, पक्षाने आपल्यालाच एबी फॉर्म दिला आहे, असा दावाही त्यांनी केला. मात्र निवडणूक प्रक्रियेदरम्यान केलेल्या कृतीमुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे.
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. उमेदवारीच्या वादातून थेट सरकारी दस्तऐवज गिळण्यापर्यंत गेलेला हा प्रकार निवडणूक प्रक्रियेच्या गंभीरतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे. निवडणूक आयोग आणि प्रशासन यापुढे अशा घटनांना आळा घालण्यासाठी कोणती पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुण्यातील या घटनेने निवडणूक रणधुमाळीला वेगळाच रंग दिला असून, पुढील काळात याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

