आबा बागुल शिवसेनेत गेल्याने स्व.लता पवारांचे पुत्र सतीश पवारांना मिळाली संधी
पुणे : दहा विद्यमान नगरसेवकांबरोबरच सात डॉक्टर, ११ वकील, सहा प्राध्यापक यांच्यासह ५० टक्क्यांहून अधिक तरुणांना यंदा प्रथम काँग्रेसकडून संधी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीत पाचहून अधिक प्रभागांत चारही जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत.पक्षाला सोडून गेलेल्या प्रभागांमध्ये नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. आघाडीच्या जागा वाटपात पक्षाला आलेल्या शंभरहून अधिक जागांवर पक्षाकडून उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले आहेत.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष बाहेर पडल्यानंतर काँग्रेसने शिवसेनेला बरोबर घेऊन रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. सलग झालेल्या निवडणुकांमध्ये पक्षाला मोठा फटका बसला. त्यातच पक्षातील गळतीबरोबरच गटबाजी रोखण्यात अपयश आलेल्या काँग्रेसच्या यादीकडे उत्सुकता लागून होती. यापूर्वी एरवी एबी फॉर्मची पळवापळवी, तिकिटासाठी सुरू असलेल्या मारामाऱ्या, पक्षात होणारी बंडखोरी आदींमुळे काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आल्याचे अनेकदा पहावयास मिळाले. या पार्श्वभूमीवर पुरेशी खबरदारी घेत मंगळवारी दिवसभरात उमेदवारी निश्चित झालेल्यांना बोलून पक्षाच्या नेत्यांकडून एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले; तर उमेदवारांची निवड करताना सर्व जाती-धर्मांना न्याय दिला जाईल, याची काळजी घेतल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
आघाडीच्या जागा वाटपात आलेल्या १०० जागांपैकी पाचहून अधिक प्रभागांत काँग्रेसचे चारही उमेदवार असणार आहेत. पक्षाचे विद्यमान नगरसेवक अरविंद शिंदे, अविनाश बागवे, रफिक शेख यांच्यासह विधानसभा निवडणुकीत शिवसेनेतून परत पक्षात आलेले ॲड. अविनाश साळवे, राजू पवार, ‘एमआयएम’च्या माजी नगरसेविका अश्विनी लांडगे, माजी नगरसेविका चांदबी नदाफ यांची सून सुरय्या नदाफ, संजय बालगुडे यांची पत्नी संजीवनी बालगुडे, माजी नगरसेवक बापू पाटोळे यांचे चिरंजीव रवी पाटोळे, माजी नगरसेविका लता राजगुरू यांचे पुत्र कुणाल राजगुरू यांना संधी दिली आहे. यंदा प्रथमच अविनाश बागवे यांच्या पत्नी इंदिरा बागवे यांना एकाच प्रभागातून उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस सोडून नव्याने पक्षात दाखल झालेले प्रशांत जगताप यांच्या मातोश्री रत्नप्रभा जगताप यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे. माजी नगरसेवक शिवाजी केदारी यांचे चिरंजीव साहिल केदारी यांना पुन्हा पक्षाकडून संधी देण्यात आली आहे.सतीश पवार, संदीप बालवडकर, निरंजन दाभेकर, ॲड. नितीन परतानी, सईद सय्यद, समाधान शिंदे, ॲड. रफिक शेख, डॉ. अतुल देवळाणकर, ॲड. रमेश पवळे, मेहबूब नदाफ, प्रवीण करपे, अक्षय जैन, ॲड. वंदना कडू, राज जाधव, जीवन चाकणकर, भूषण रानभरे, नयना सोनार, सन्मित्र बँकेचे चेअरमन गणेश फुलारे, मोहसीन खान, दीपाली संतोष ढोक यांना पक्षाकडून नव्याने संधी देण्यात आली आहे.

