पुणे:पुण्यातल्या जर्मन बेकरी स्फोटातील आरोपीवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे ही घटना घडली. बंटी जहागिरदार असं या आरोपीचं नाव आहे.दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.
१३ फेब्रुवारी २०१० रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील प्रसिद्ध ‘जर्मन बेकरी’मध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला होता. संपूर्ण देशाला हादरवून टाकणारा हा एक मोठा दहशतवादी हल्ला होता. या स्फोटात एकूण १८ लोकांचा मृत्यू आणि ६० हून अधिक जण जखमी झाले होते. ‘इंडियन मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेने ‘लष्कर-ए-तैयबा’च्या मदतीने हा स्फोट घडवून आणल्याचं तपासामध्ये स्पष्ट झालं होतं.
याच बॉम्बस्फोटातला एक आरोपी बंटी जहागिरदार याच्यावर गोळीबार झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जहागिरदार याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर बंटी जहागिरदारला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
गोळीबाराच्या घटनेनंतर श्रीरामपूर शहरात तणावाची परिस्थिती आहे. अस्लम शेख उर्फ बंटी जहागिरदार हा पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्पोटातील आरोपी असल्याने संपूर्ण देशाचं लक्ष या घटनेकडे लागून राहिलं आहे. 2023 पासून हा जहागिरदार जामिनावर बाहेर होता. पोलिसांकडून अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

