मुंबई-सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी राज्य सरकारने सेलिब्रेशनच्या वेळेत मोठी वाढ केली आहे. 31 डिसेंबरच्या रात्री राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि आर्केस्ट्रा बार पहाटे 5 वाजेपर्यंत उघडे ठेवण्यास अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे हॉटेल व्यावसायिक आणि पार्टीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, ही सवलत देताना प्रशासनाने काही कडक अटीही लागू केल्या आहेत.
राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, पहाटे 5 वाजेपर्यंतची ही सवलत केवळ बंदिस्त किंवा इनडोअर आस्थापनांसाठीच लागू असेल. खुल्या जागा, इमारतींचे टेरेस किंवा मोकळ्या मैदानावरील सेलिब्रेशनला ही वेळ मर्यादा लागू असणार नाही. तिथे प्रचलित नियमांनुसारच वेळेचे पालन करावे लागेल. इनडोअर कार्यक्रम करतानाही ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळणे अनिवार्य असेल.
नाक्या-नाक्यावर पोलिसांचा ‘वॉच’
नवीन वर्षाच्या स्वागताला गालबोट लागू नये, यासाठी गृह विभागाने सुरक्षिततेची चोख व्यवस्था केली आहे. राज्यभरात विशेषतः मुंबई, पुणे, ठाणे आणि नवी मुंबई यांसारख्या शहरांत पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मद्यपान करून गाड्या चालवणाऱ्यांविरोधात पोलिसांनी ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले असून ठिकठिकाणी ब्रेथ ॲनालायझरसह तपासणी केली जाणार आहे. रेव्ह पार्ट्या आणि अमली पदार्थांच्या तस्करीवर पोलिसांच्या गुन्हे शाखेची विशेष करडी नजर असणार आहे.
आनंद साजरा करा, पण कायदा पाळा
नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नागरिकांना आवाहन करताना म्हटले आहे की, “नागरिकांनी उत्साहात आणि आनंदाने नवीन वर्षाचे स्वागत जरूर करावे, मात्र कायदा व सुव्यवस्थेला बाधा येईल असे कृत्य करू नये. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर किंवा हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”

