मारटकर हत्या प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या
कुख्यात गुंड बापू उर्फ कुमार प्रभाकर नायर प्रभाग क्रमांक ३९ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) तिकीटावर
कुमार ऊर्फ बापू प्रभाकर नायर असे त्याचे पूर्ण नाव आहे. नायर याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, जमीन बळकावणे, खंडणी आदी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 2020 साली युवा सेना पदाधिकारी दीपक मारटकर यांची हत्या झाली होती. त्या गुन्ह्यात देखील नायरला अटक झाली होती. मागील वर्षी जमीन बळकावल्याच्या गुन्ह्यात लागलेल्या मोक्क्यात त्याला जामीन मिळाला होता.त्यानंतर, बापू नायरने राजकीय पक्षांकडे उमेदवारीसाठी चाचपणी सुरु केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नायरला उमेदवारी देत सर्वांनाच धक्का दिला आहे. कुख्यात गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे, बंडू आंदेकरच्या जवळच्या नातेवाईक लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर यांनाही उमेदवारी दिली आहे. या सर्व उमेदवारींमुळे राष्ट्रवादीवर टीका देखील होऊ लागली आहे.
पुणे-पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने (AP) जाहीर केलेल्या उमेदवारी यादीमुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.गुन्हेगारीमुक्त पुण्याच्या गप्पा मारणाऱ्या अजित पवारांच्या पक्षाने थेट कुख्यात गुंड आणि गंभीर गुन्ह्यातील आरोपींच्या नातेवाईकांना निवडणुकीच्या मैदानात उतरवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. गुन्हेगारांना टायरमध्ये घाला, तुम्हाला गाड्या घोड्या दिल्यात कोयता गँगचा बंदोबस्त करा नाहीतर बघतोच तुमच्याकडे, कोयता गँग दिसली तर तुमची काय बरी गत नाही. अशा एक ना अनेक वलग्ना करणाऱ्या अजित पवारांचं नक्की काय चाललंय हे समजायला मार्ग पुणेकरांना राहिला नाही. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत की गुन्ह्याचे? हा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे.
कारण पुण्यातील कुख्यात गुंड बापू उर्फ कुमार प्रभाकर नायर याने प्रभाग क्रमांक ३९ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) तिकीटावर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे, २०२० मधील युवासेना नेते दीपक मारटकर हत्या प्रकरणात बापू नायरचे नाव समोर आले होते. या हत्येचा कट रचल्याच्या संशयावरून त्याला अटकही झाली होती. २०२१ मध्ये तो बाहेर आल्यानंतर पुन्हा या प्रकरणात अडकला आणि २०२४ मध्ये जामिनावर बाहेर आला. आता थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीने त्याला अधिकृत उमेदवारी दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
केवळ बापू नायरच नव्हे, तर ‘गँगवॉर’ची पार्श्वभूमी असलेल्या आंदेकर टोळीलाही अजित पवारांनी बळ दिले आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणात सध्या तुरुंगात असलेल्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांना प्रभाग २३ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. या दोन्ही महिला तुरुंगातूनच निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय, पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याच्या पत्नी जयश्री मारणे यांनाही अजित पवार गटाने उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
काही महिन्यांपूर्वी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची भाषा करणाऱ्या अजित पवारांनी आता चक्क गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना ‘एबी फॉर्म’ वाटल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे. “गुन्हेगारांना टायरमध्ये घालण्याची भाषा करणारे पालकमंत्री आता त्यांना पालिकेत का पाठवू पाहत आहेत?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, एकीकडे पुणे शहर आयटी हब आणि शिक्षणाचे केंद्र म्हणून विकसित होत असताना, दुसरीकडे महापालिका निवडणुकीत गुन्हेगारी टोळ्यांच्या सदस्यांचा सक्रिय सहभाग वाढत आहे. खंडणी, हत्या आणि धमकावण्याचे गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना राजकीय आश्रय मिळाल्याने सामान्य मतदारांमध्ये भीती आणि अस्वस्थता पसरली आहे.

