पुणे: पुण्यातील मध्यवस्तीचा परिसर असलेल्या प्रभाग क्रमांक २५ (शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई) मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने व भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बाप्पु मानकर यांच्यासह स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित यांनी विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयात अर्ज दाखल केला. यावेळी मा. नगरसेवक दिलीप काळोखे, मा. नगरसेविका गायत्री खडके, भाजपा कसबा मतदार संघाचे अध्यक्ष अमित कंक, प्रभाग २५ चे भाजपा अध्यक्ष सुनील रसाळ आणि भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे उपस्थित होते.
गेल्या दहा वर्षात पक्ष संघटनेच्या विविध पदांवर केलेले काम आणि प्रभाग क्रमांक २५ मधील नागरिकांच्या समस्यांचे केलेले निराकरण या मुळे पक्षाने संधी दिली असून या संधीचे सोने करीन, असा विश्वास बाप्पु मानकर यांनी या वेळी व्यक्त केला.
पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक २५ (शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई) मधील ब गटातून बाप्पु मानकर यांना उमेदवारी जाहीर झाली. बाप्पु यांच्याबरोबरच या प्रभागात स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेली नऊ वर्षे बाप्पु मानकर यांनी पक्षाच्या विविध पदांवर काम केले असून या कामांच्या जोरावर पक्षाने आपल्याला संधी दिली असल्याच्या भावना बाप्पु मानकर यांनी व्यक्त केल्या. पुण्यातील पहिल्या २४ तास जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या असंख्य तक्रारींचे निवारण केल्याने बाप्पु मानकर हे प्रभागात सर्वश्रुत होते. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेला त्यांचा जनसंपर्कही या उमेदवारीसाठी महत्वाचा ठरला आहे. प्रभाग क्रमांक २५ मधील जनता जाणती असून भारतीय जनता पक्षाने देशात, राज्यात आणि पुणे शहरात केलेल्या सर्वांगीण विकासाच्या पाठीशी नागरिक ठामपणे उभे राहतील आणि प्रभाग क्रमांक २५ मधील भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करतील असा विश्वासही बाप्पु मानकर यांनी या वेळी व्यक्त केला.

