मुंबई: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून आता महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात कलगीतुरा सुरू झाला आहे. गोस्वामी यांच्या अटकेवरून ठाकरे सरकारला लक्ष्य करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. आम्ही सुडाचं राजकारण करत नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
.
‘महाराष्ट्राच्या कायद्याचं राज्य आहे. इथे बदल्याच्या भावनेनं कारवाई होत नाही. कोणीही कायद्याचं उल्लंघन केल्यास पोलीस त्याच्याविरोधात कारवाई करतील,’ असं राऊत म्हणाले. पोलिसांकडे सबळ पुरावे असतील, त्यामुळेच त्यांनी कारवाई केली असेल, असंही त्यांनी म्हटलं. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीदेखील अर्णब यांच्या अटकेचं समर्थन केलं आहे. ‘ज्यांच्या कुटुंबाचा आधारच हिरावून नेला देवासमान आई हिरावून नेली अशा पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणे हेच कोणत्याही कायद्याचे राज्य असलेल्या शासनाचे कर्तव्य होय,’ असं आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

